भूगावच्या आदर्श शाळेवर विद्यार्थी, पालकांचा बहिष्कार
By Admin | Updated: September 24, 2015 00:23 IST2015-09-24T00:23:54+5:302015-09-24T00:23:54+5:30
परतवाडा मुख्य महामार्गावरील भूगाव येथील आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी बुधवारपासून शाळेवर बहिष्कार टाकला.

भूगावच्या आदर्श शाळेवर विद्यार्थी, पालकांचा बहिष्कार
पोलिसांना पाचारण : शिक्षिकेला शिकविता येत नसल्याचा आरोप
नरेंद्र जावरे अचलपूर
अमरावती-परतवाडा मुख्य महामार्गावरील भूगाव येथील आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी बुधवारपासून शाळेवर बहिष्कार टाकला. शिक्षिकेला गणित व विज्ञान विषय शिकविता येत नसल्याचा आरोप करीत पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. शिक्षिकेची हकालपट्टी करीत नाही, तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा पवित्रा पालकांनी घेतला आहे.
भूगाव येथे आदर्श शिक्षण संस्थेद्वारा १९६१ पासून आदर्श विद्यालय सुरू आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत २७० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. मागील दीड वर्षांपासून येथे गणित व विज्ञान विषयासाठी प्रतिभा गुणवंतराव ठाकरे या शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली. या उच्चशिक्षित शिक्षिकेला शिकविता येत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे केल्या होत्या. पालकांनी संस्थाध्यक्ष प्रदीप पाटील व मुख्याध्यापक आर.के.गादे यांना याबाबत माहिती दिली होती. या दोन्ही जबाबदार व्यक्तिंनी शिक्षिकेला शिक्षण पध्दतीत सुधारणा करून विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत शिकविण्याची नोटीस बजावली होती. मात्र, कुठलीच सुधारणा न झाल्याने संतप्त पालकांनी बुधवारी सकाळी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही. सर्व विद्यार्थी व पालकींनी संबंधित शिक्षिकेला शिकविण्यास बंदी घालावी, शाळेतून काढून टाकावे, अशी मागणी शाळेसमोर केली. पालकांचा संताप लक्षात घेता अनुचित प्रकार घडू नये म्हणून सरमसपुरा पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
शिकविण्याची पद्धत चुकीची
प्रतिभा ठाकरे या इयत्ता सहावी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषय शिकवितात. एके दिवशी शिकविताना ९ मधून ६ गेल्यास ६ उरतील, १८० मधून १४० वजा केल्यास १४० उरतील, अशी उत्तरे दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना केला. शिक्षिकेची शिकविण्याची पध्दत समजत नसल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.
मुख्याध्यापकांवर लावले आरोप
शिक्षिकेला शिकविता येत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्याने तिच्या शिकवण्याच्या पध्दतीचे अवलोकन करण्याकरिता मुख्याध्यापकांनी त्यांच्या वर्गाला भेट दिली. स्थिती लक्षात आल्यानंतर सुधारणेबाबत लेखी सूचना आणि पत्रसुद्धा त्यांनी शिक्षिकेला दिले. परंतु शिक्षिकेने त्यांच्यावर नको ते आरोप केल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.
राजीनामा किंवा कारवाई
या शिक्षिकेला कार्यपद्धतीबद्दल यापूर्वीच रीतसर नोटीस बजावण्यात आली आहे. बुधवारपासून शाळा बंदचा निर्णय विद्यार्थी-पालकांनी घेतला. परिणामी शिक्षिकेविरुध्द नियमसंगत कारवाई होणार असून दुसरीकडे सदर शिक्षिकाच राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा वाद शमण्याची चिन्हे दिसत आहे.