टायपिंगच्या परीक्षेसाठी विद्यार्थी वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2017 00:27 IST2017-01-10T00:27:14+5:302017-01-10T00:27:14+5:30
टायपिंग परीक्षेसाठी सोमवारी सायन्सकोर हायस्कूलच्या मराठी, उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारण्यात आला.

टायपिंगच्या परीक्षेसाठी विद्यार्थी वाऱ्यावर
सायन्सकोरच्या प्राचार्यांचा प्रताप : मुले, मुलींना वर्गात प्रवेश नाकारला
अमरावती : टायपिंग परीक्षेसाठी सोमवारी सायन्सकोर हायस्कूलच्या मराठी, उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे शेकडो मुला-मुलींना एक दिवसाच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. हा सर्व प्रकार सायन्सकोर हायस्कूल प्राचार्याच्या चुकीमुळे झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत ९ ते १३ जानेवारी दरम्यान सलग पाच दिवस चालणार आहे. ही परीक्षा जिल्हाभरात सुरू आहे. त्यानुसार येथील सायन्सकोर हायस्कूलमध्ये मराठी, उर्दू शाळेतही टायपिंग परीक्षेचे केंद्र नेमण्यात आले होते. टायपिंग परीक्षेचे केंद्र घोषित करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापकांचे संमती पत्र मिळविले होते. मात्र सायन्सकोर येथील मराठी, उर्दू माध्यम हायस्कूल हे टायपिंग केंद्र घोषित करण्यात आले असताना या हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी काहीही माहिती दिली नाही. त्यामुळे सोमवार उजळताच सकाळच्या सत्रातील मराठी, उर्दू माध्यमांचे इयत्ता पाचवी ते १२ वीपर्यंतचे विद्यार्थी नियमितपणे वर्गात जाण्यास निघाले असता त्यांना रोखण्यात आले.
तसेच शिक्षकांनाही हायस्कूलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. नेमके काय झाले? हे विद्यार्थी, प्राध्यापकांनाही कळू शकले नाही. मराठी, उर्दू माध्यमांचे दोन्ही हायस्कूल टायपिंग परीक्षा केंद्रासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ताब्यात घेतले होते. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले. शिक्षकांनाही काय करावे, हे समजले नाही. अखेर प्राचार्याने मराठी, उर्दू हायस्कूल हे टायपिंग परीक्षेसाठी केंद्र म्हणून दिले, ही चूक लक्षात येताच शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड हेदेखील घटनास्थळी पोहोचले. मंगळवारपासून सायन्सस्कोरचे मराठी, उर्दू हायस्कूल केंद्र टायपिंग परीक्षेसाठी राहणार नाही, असा निर्णय शिक्षणाधिकारी राठोड यांनी घेतला. त्यानंतर विद्यार्थी शिक्षण न घेता आल्यापावली परतले. मात्र एका दिवसाच्या शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले. याप्रकरणी शिक्षणाधिकारी प्राचार्यांविरुद्ध कोणती कारवाई करतात, याकडे नजरा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापकांना शोकॉज
सायन्सस्कोर मराठी, उर्दू हायस्कुलमध्ये टायपिंग परीक्षा केंद्र असताना प्राचार्यांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना सोमवारी एका दिवसाच्या शिक्षणापसून वंचित राहावे लागले. याप्रकरणी मुख्याध्यापक आर.एन. देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावून सत्यता तपासली जाईल. त्यानंतर याप्रकरणी कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सी.आर. राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
उर्दू हायस्कुल हे टायपिंग परीक्षेसाठी केंद्र नेमण्यात आले होते. मात्र काही चुकांमुळे ही बाब शिक्षक, विद्यार्थ्यांना कळवू शकलो नाही. त्यामुळे विद्यार्थी एक दिवस शिक्षणापासून वंचित राहिले. नियोजनाचा अभावामुळे हा प्रकार घडला.
- आर.एन. देशमुख
प्राचार्य, सायन्सस्कोर हायस्कुल