अर्ज न भरता विद्यार्थी परीक्षेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:30+5:30
विद्यापीठात यावर्षीपासून बीए, बीकॉम, बीएस्सी शाखेच्या प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांची ऑनलाइन नामांकन माहिती सुरू केली आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती विद्यापीठात पाठविली. परंतु, परीक्षेच्या ऑनलाइन कामकाजाची जबाबदारी असलेल्या लर्निंग स्पायरल कंपनीने ही ऑनलाइन नामांकन यादी परीक्षार्थींची नावे म्हणून स्वीकारली आणि ऑनलाइन प्रवेशपत्र पाठविले.

अर्ज न भरता विद्यार्थी परीक्षेला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिवाळी २०१९ परीक्षेचे फॉर्म न भरता विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात बहुतांश विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गुणपत्रिकासुद्धा काढण्यात आल्या आहेत. मात्र, ही बाब महाविद्यालयांच्या निदर्शनास आल्यानंतर आता विद्यापीठात धावाधाव सुरू झाली आहे. विद्यापीठात ऑनलाइन कामकाज कसे सुरू आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले.
विद्यापीठात यावर्षीपासून बीए, बीकॉम, बीएस्सी शाखेच्या प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांची ऑनलाइन नामांकन माहिती सुरू केली आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती विद्यापीठात पाठविली. परंतु, परीक्षेच्या ऑनलाइन कामकाजाची जबाबदारी असलेल्या लर्निंग स्पायरल कंपनीने ही ऑनलाइन नामांकन यादी परीक्षार्थींची नावे म्हणून स्वीकारली आणि ऑनलाइन प्रवेशपत्र पाठविले. एवढेच नव्हे तर त्यांची गुणपत्रिका संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाच्या गोपनीय विभागात एकच गोंधळ उडाला. दुसरीकडे महाविद्यालये हैराण झाली असून, ऑनलाइन नामांकन यादी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा न देता गुणपत्रिका तयार झाल्या कशा, याबाबत प्रश्न विचारला जात आहे.
यवतमाळ येथील दोन महाविद्यालयांनी यासंदर्भात विचारणा केल्यानंतर हा सावळागोंधळ उघड झाला. ऑनलाइन कामकाजामुळे परीक्षा अर्ज आणि महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची नामांकन यादीचे क्रॉस चेकींग करण्यात येत नाही. एजन्सीकडून परस्पर विद्यार्थ्यांच्या माहितीचा डेटा घेतला जातो. त्यामुळे ऑनलाइन नामांकनाची माहिती परीक्षार्थींची यादी म्हणून स्वीकारल्या गेली. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले नाही. तरीही त्यांना ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र पाठविण्यात आले.
ऑनलाइन नामांकन माहिती आणि परीक्षा अर्जांची तपासणी करूनच ती विद्यापीठाला पाठविणे आवश्यक आहे. मात्र, काही महाविद्यालयांनी दोनदा माहिती पाठविली. त्यामुळे परीक्षा अर्ज दुसऱ्यांदा घेण्यात आले. याबाबत पुनर्तपासणी सुरू असून, ते सुरळीत करण्यात येत आहे.
- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ.