तीन तास थांबली एसटीची चाके
By Admin | Updated: December 18, 2015 00:13 IST2015-12-18T00:13:25+5:302015-12-18T00:13:25+5:30
सन २०१२-२०१६ कामगार करार रद्द करुन या कालावधीतच २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा,

तीन तास थांबली एसटीची चाके
इंटकचे आंदोलन : पोलीस बंदोबस्तात निघाल्या बसेस
अमरावती : सन २०१२-२०१६ कामगार करार रद्द करुन या कालावधीतच २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कस काँग्रेस (इंटक)ने गुरुवारपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. हा संप राज्यभर पुकारण्यात आला आहे. त्याचा फटका हजारोे प्रवाशांना सहन करावा लागला.
गुरुवारी सकाळी ६.३० ते ९.३० या कालावधीत मध्यवर्ती बसस्थानकामध्ये इंटकच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारल्याने एसटीची चाके थांबली होती. दुसरीकडे बाहेरगावावरुन बसस्थानकात येणाऱ्या एसटीची मालटेकडीपर्यंत रांग लागली होती. या तीन तासांच्या कालावधीत कोणतीही बस स्थानकाबाहेर पडली नाही. त्यानंतर शहर कोतवाली पोलिसांच्या मदतीने एसटीची वाहतूक पूर्ववत करण्यात आली. यावेळी इंटकविरुद्ध महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे कामगार समोरासमोर ठाकले होते.
एसटी कामगार संघटना आंदोलनापासून दूर
अमरावती : एसटी कामगार संघटनेचा या बंदला पाठिंबा नसल्याने हे आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप इंटकने केला. आगार प्रमुखांनी इंटकच्या आंदोलनाची माहिती शहर कोतवाली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत एसटीच्या फेऱ्या सोडण्यात आल्यात. या आंदोलनाचे नेतृत्त्व विभागीय सचिव राजाभाऊ लुंगे यांनी केले. या संपात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना सहभागी नाही. इंटकचा संप प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरणारा असून राज्यातील ७० हजार सभासद यात सहभागी नसल्याचे एसटी कामगार संघटनेचे प्रादेशिक सचिव अभय बिहुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)