संतप्त शेतकऱ्यांचा कर्जासाठी बँकेत ठिय्या
By Admin | Updated: June 26, 2015 00:27 IST2015-06-26T00:27:45+5:302015-06-26T00:27:45+5:30
शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीक कर्ज देण्याकरिता येथील अलाहाबाद बँकेने ...

संतप्त शेतकऱ्यांचा कर्जासाठी बँकेत ठिय्या
गोंधळ : वाढोणा येथील अलाहाबाद बँकेतील घटना
मनीष कहाते वाढोणा रामनाथ
शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीक कर्ज देण्याकरिता येथील अलाहाबाद बँकेने गेल्या महिन्याभरापासून टाळाटाळ केल्याने गुरुवारी सुमारे २०० शेतकऱ्यांनी बँकेला घेराव घातला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दोन दिवसात कर्जपुरवठा न केल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गत तीन वर्षांपासून वाढोणा रामनाथ परिसरात नापिकी झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहेत. परंतु येथील अलाहाबाद बँकेला कर्ज वाटपाचे कोणतेच आदेश नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकरी महिन्याभरापासून बँकेत कर्ज मिळण्याकरिता पायऱ्या झिजवित आहेत. परंतु बँक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी कर्जापासून वंचित आहेत. १७ जून रोजी येथील शेतकऱ्यांनी कर्ज वाटपासंदर्भात विनंती अर्ज दिला. परंतु बँक व्यवस्थापनाने अर्जाला केराची टोपली दाखविली. पैसे नसल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही पेरणी केली नाही. त्यामुळे सुमारे २०० शेतकऱ्यांनी संतप्त होऊन अलाहाबाद बँकेत कर्ज मागणीचा प्रश्न रेटून धरला. संतप्त शेतकऱ्यांची बँक व्यवस्थापकांशी शाब्दीक चकमकही उडाली. बँकेला कुलूप ठोकण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला तर काही शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली.
दोन दिवसात कर्ज वाटप करा, अन्यथा बँक चालू देणार नाही, असा इशारा शेतकरी सुरेश गायधनी, सीताराम कंटाळे, प्रभाकर वाघमारे, रुपराव कटाळे, दीपक शहाडे, नितीन जकवार, गणेश शिरबहाद्दूरकर, विष्णू तिरमारे, सुनील येवले, मोहन इलमे, सुधीर शिंदे, चंपत बनारसे, पंजाबराव माटोडे, अरूण माटोडे, मनोज कुकडे, रामकृष्ण गायधनी, रामदास शहाडे, संजय मोटोडे, बाळासाहेब येवले यांनी दिला आहे.