वन्यप्राण्यांची तृष्णा भागवण्याची ‘त्या’ची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:43 IST2018-06-01T22:42:55+5:302018-06-01T22:43:05+5:30
वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावानजीक येत असल्याच्या घटना उन्हाळ्यात वारंवार निदर्शनास येतात. त्यामुळे बरेचदा मानवाशी त्यांचा संघर्ष होतो. त्यांच्याच परिसरात त्यांच्या तृष्णातृप्ती झाल्यास ही परिस्थिती उद्भवणार नाही, याचे भान राखून मोखड येथील युवकाने डोंगरात पाणवठे तयार करून पखालीने त्यात पाणी भरत असतो.

वन्यप्राण्यांची तृष्णा भागवण्याची ‘त्या’ची धडपड
लोकमत न्यूज नेटवर्क
मोखड : वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावानजीक येत असल्याच्या घटना उन्हाळ्यात वारंवार निदर्शनास येतात. त्यामुळे बरेचदा मानवाशी त्यांचा संघर्ष होतो. त्यांच्याच परिसरात त्यांच्या तृष्णातृप्ती झाल्यास ही परिस्थिती उद्भवणार नाही, याचे भान राखून मोखड येथील युवकाने डोंगरात पाणवठे तयार करून पखालीने त्यात पाणी भरत असतो.
पंकज पवार असे या अवलीया तरुणाचे नाव आहे. मोखड शेतशिवाराला लागून पडीक जमीन असून, या भागात जंगली वन्यप्राण्याचे वास्तव्य आहे. रखरखत्या उन्हात पिण्याकरिता पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात त्यांची भटकंती होते. त्या मुक्या प्राण्यांची तहान भागविण्याची कल्पना या तरूणाला आली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत हे गाव सहभागी झाले आहे. त्यामध्ये श्रमदान केल्यानंतर या भागात खडकावर पाणवठे खोदून, पाणवठ्यात प्लास्टिक पन्नीचे आच्छादन टाकून त्यात तो कावडीने पाणी आणून टाकतो. भरउन्हात हा युवक मुक्या प्राण्यांची तहान भागवत असून, पाणवठ्यावर वन्यप्राणी पाणी पिऊन तृप्त होतात, हे विशेष. डोंगराळ भागात खडकाशी भिडून हा युवक पाणवठा तयार करतो. १ ते २ किलोमीटरपर्यंत पायी चालत पखालीने पाणी आणून पाणवठ्यात टाकतो. एकट्याने सुरुवात केली असली तरी आता त्याला सहकारी लाभले आहे. खोदलेल्या पाणवठ्यात पावसाचं पाणी येईपर्यंत पाणवठे भरून मुक्या वन्यप्राण्यांना पाणी पाजण्याचा त्यांचा संकल्प आहे.