लॉकडाऊनला तीव्र विरोध, व्यापारी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:24+5:302021-04-10T04:12:24+5:30
एसडीओंना निवेदन, पोटावर मारू नकाची आर्जव दर्यापूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व लहान-मोठ्या ...

लॉकडाऊनला तीव्र विरोध, व्यापारी एकवटले
एसडीओंना निवेदन, पोटावर मारू नकाची आर्जव
दर्यापूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व लहान-मोठ्या दुकानदारांचे कंबरडे मोडले असून, सर्व व्यवसाय डबघाईस आले आहेत. त्यात आता पुन्हा ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावून संपूर्ण मार्केट बंद ठेवण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर गुरुवारी व्यापारी एकवटले. अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
अत्यावश्यक सेवेमध्ये काही दुकानदारांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्यावर अवलंबून असलेली तसेच या संबंधित असलेली दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहे. शहरातील बांधकामांना परवानगी देण्यात आली. मात्र, त्या बांधकामांना अत्यावश्यक असलेल्या मालाची प्रतिष्ठाने हार्डवेअर, इलेक्ट्रिकल्स, दरवाजे, प्लायवुड, सिमेंट इत्यादी बंद ठेवण्यात आली आहे. हा मोठा विरोधाभास या लॉकडाऊनमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. शासनाच्या निर्णयाचा रोष व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे सर्व दुकानदारांना आपली प्रतिष्ठाने सोशल डिस्टंसिंग व सॅनिटाईझचा वापर इत्यादी नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार योगेश देशमुख, मुख्याधिकारी गीता वंजारी, पोलीस निरीक्षक रमेश आत्राम हेसुद्धा उपविभागीय कार्यालयात उपस्थित होते.