बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST2021-07-27T04:14:07+5:302021-07-27T04:14:07+5:30

अमरावती : बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरीत्या संपूर्ण खचलेल्या विकल अवस्थेत तिला बालगृहात आणण्यात आले. खरे तर ...

Striving for higher education of kindergarten children | बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील

अमरावती : बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरीत्या संपूर्ण खचलेल्या विकल अवस्थेत तिला बालगृहात आणण्यात आले. खरे तर सगळेच संपलेय, अशी तिची अवस्था. मात्र, या अवस्थेवर, यातनांवर मात करीत तिने आज भरारी घेतली. दहावीच्या शालांत परीक्षेत तिने चक्क ९७ टक्के गुण मिळवले. या यशाचे महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले.

एकटीची ही गोष्ट नाही, तिच्यासारख्याच बालगृह आणि अनुरक्षण गृहातील अन्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याची ग्वाही मंत्री ठाकूर यांनी दिली आहे.

शासनाच्या बालगृहात तसेच अनुरक्षण गृहात असणाऱ्या ५७४ मुला-मुलींनी दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे. त्यांचे हे यश एक महत्त्वाचा टप्पा असून महिला व बालविकास विभाग यापुढेही त्यांच्या उच्चशिक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रयत्न करणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून या मुलांच्या पंखात बळ देण्याचे काम शासन निश्चितच करेल, अशी ग्वाही यशोमती ठाकूर यांनी दिली.

राज्यातील विविध कारणास्तव आधाराची गरज असलेली मुले बालगृहात तर विधिसंघर्षित बालके (चाईल्ड इन कॉन्फ्ल‍िक्ट विथ लॉ) पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते. अत्याचार झालेल्या किंवा अन्य कारणांमुळे बालगृहात यावे लागलेल्या तसेच वाट चुकल्यामुळे अनुरक्षण गृहात यावे लागलेल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत घेतली जाते. त्यासाठी या मुलांना शालेय तसेच उच्च शिक्षण यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते.

दहावीच्या परीक्षेला राज्यातील विविध बालगृह आणि अनुरक्षण गृहातील सुमारे ६०० विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. यापैकी ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात २८४ मुली आणि २९० मुले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे यातील सुमारे ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या श्रेणीत अथवा विशेष श्रेणीत प्रावीण्य मिळवले आहे. या परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप मंत्री ना. ठाकूर यांनी दिली.

Web Title: Striving for higher education of kindergarten children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.