येवदा येथे कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:11 IST2021-04-12T04:11:33+5:302021-04-12T04:11:33+5:30
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ : जनता मात्र बिनधास्त येवदा : दर्यापूर तालुक्यातील येवदा या सर्वांत मोठ्या गावात तूर्तास आठ कोरोनाग्रस्त ...

येवदा येथे कडकडीत बंद
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ : जनता मात्र बिनधास्त
येवदा : दर्यापूर तालुक्यातील येवदा या सर्वांत मोठ्या गावात तूर्तास आठ कोरोनाग्रस्त आहेत. प्रशासन सज्ज असले तरी येथील जनता मात्र बिनधास्त वावरत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊनला अख्खे प्रशासन येवद्यात उतरल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला.
तहसीलदार योगेश देशमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी गायगोले, उपसरपंच मुजम्मिल जमादार, ठाणेदार अमूल बच्छाव यांनी शनिवारी सकाळीच येवदा गावात फिरून वीकेंड लॉकडाऊनचा आढावा घेतला. येवदा ग्रामस्थ कोरोना त्रिसूत्रीचे पालन करीत नसल्याचे निदर्शनात येत असल्याने तहसीलदार योगेश देशमुख यांनी येवदा येथील कोरोनाग्रस्त वाॅर्ड नंबर २ मध्ये पाहणी केली. संक्रमितांशी संवाद साधला. येवदा येथील मेन रोड आणि वाॅर्ड क्रमांक २ सील करण्यात आले.
येवदा येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी त्रिसूत्रीचे पालन करून प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन तहसीलदार योगेश देशमुख यांनी केले. कायद्याचे पालन करण्याचे आवाहन ठाणेदार अमूल बच्छाव यांनी केले. जो कुणी नियमाचे उल्लंघन करेल, त्याच्याविरुद्ध आम्ही निश्चितपणे कारवाई करू, असा इशारा वैद्यकीय अधिकारी संजय पाटील यांनी दिला. येवदा येथील रामा हिरूळकर, अक्षय अग्रवाल व राम रघुवंशी या व्यापाऱ्यांनी त्यांच्या नुकसानाबाबत प्रशासनाला अवगत केले. मात्र, त्याच वेळी गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये, याकरिता आम्ही व्यापारी लोक शासनालाच मदत करू, कुठल्याही नियमाचे उल्लंघन न करता त्यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करू, असा प्रतिसाद दिला.
-----------------