धारणीत आंतरधर्मीय विवाहामुळे तणाव
By Admin | Updated: March 13, 2015 00:22 IST2015-03-13T00:22:40+5:302015-03-13T00:22:40+5:30
येथील मुस्लिम युवक आणि हिंदू युवतीने प्रेमप्रकरणातून गुपचूप विवाह उरकल्याचे प्रकरण चिघळले आहे.

धारणीत आंतरधर्मीय विवाहामुळे तणाव
धारणी : येथील मुस्लिम युवक आणि हिंदू युवतीने प्रेमप्रकरणातून गुपचूप विवाह उरकल्याचे प्रकरण चिघळले आहे. त्यात युवकाने विवाहित असल्याचे लपवून खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हा विवाह केल्याने हिंदू समाजातील स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. गुरूवारी युवकाच्या पहिल्या पत्नीने ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन युवकाविरूध्द तक्रार नोंदविल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून दुसरीने मात्र यानंतरही युवकासोबतच राहण्याचा निर्धार पोलीस अधीक्षकांसमोर जाहीर केला.
विस्तृत माहितीनुसार, धारणीतील होली चौकात मुस्लिम युवकाची मोबाईल शॉपी आहे. या युवकाचे नजीकच राहणाऱ्या एका प्रतिष्ठित हिंदू कुटुंबातील मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.
धारणी पोलिसांवर रोष
धारणी : या दोघांनी गुपचूप अमरावती येथे मुस्लिम रिती-रिवाजाप्रमाणे विवाह देखील उरकला. यावेळी तरूणाने तो अविवाहित असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. वास्तविक त्याचा विवाह अमरावतीनजीकच्या बडनेरा येथील मुस्लिम तरूणीसोबत आधीच झाला आहे. त्यांचे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहे. ही बाब काही दिवसांनी तरूणीच्या आई-वडिलांना समजली. सोमवारी त्यांनी याबाबत धारणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली व युवकावर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणात मुलाच्या आई-वडील व मामाविरूध्द कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.
मात्र, तक्रार देऊन तीन दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी कोणतीच हालचाली न केल्याने संतप्त झालेल्या हिंदू समुदायातील नागरिकांनी एक बैठक घेऊन पुन्हा बुधवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच हा ‘लव्ह जेहाद’चा प्रकार असल्याने १३ मार्चपर्यंत कारवाई न झाल्यास १४ मार्चला चक्काजाम करण्याचा इशारा तक्रारीतून देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन हिंदू समुदायातील नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनाही दिले होते. दरम्यान तरूण-तरूणीने ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून आपली कैफीयत मांडली. त्यानंतर धारणी पोलिसांसह दोन्ही पक्षाच्या पालकांना आणि प्रतिष्ठितांनाही पोलीस अधीक्षक कार्यालयात पाचारण करण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत दोन्ही पक्षांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी
हे प्रकरण ‘लव्ह जेहाद’चे असल्याची चर्चा रंगत असल्याने धारणीसह अमरावती येथील हिंदू संघटनांचे तसेच भाजपचे काही पदाधिकारीही एसपी कार्यालयात पोहोचले होते. त्यांनीदेखील याप्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये धारणी भाजपच्या अध्यक्ष क्षमा चौकसे, शिवराय कुलकर्णी, सुरेखा लुंगारे, विजय शर्मा, सुधा तिवारी, किरण पातुरकर यांचा समावेश होता.