रस्त्यांवर अवकळा, नागरिक हैराण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 00:15 IST2016-10-25T00:15:47+5:302016-10-25T00:15:47+5:30
शहरातील गडगडेश्वर परिसरातील न्यू शिक्षक कॉलनी, अनुपम कॉलनी, पुष्पक कॉलनी परिसराचा फेरफेटका मारला असता....

रस्त्यांवर अवकळा, नागरिक हैराण !
तक्रारींचा रतीब, दुरूस्ती नाही : न्यू शिक्षक कॉलनी, अनुपम-पुष्पक कॉलनीवासीयांची व्यथा
अमरावती : शहरातील गडगडेश्वर परिसरातील न्यू शिक्षक कॉलनी, अनुपम कॉलनी, पुष्पक कॉलनी परिसराचा फेरफेटका मारला असता या भागातील नागरिक किती बिकट अवस्थेत जीवन जगत आहेत, याची प्रचिती येते. या भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. नव्हे, रस्त्यांवर नुसते खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. याशिवाय इतरही समस्या आहेत. मात्र, महापालिकेकडे तक्रारींचा रतीब घालूनही कोणताच मार्ग निघत नसल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
दरम्यानच्या काळात गडगडेश्वर प्रभागात डीपी मार्गाचे खडीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून कोणत्याही रस्त्याची साधी डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या भागातील नागरिकांना विविध गरजांसाठी सातत्याने मध्यवस्तीत यावे लागते. परंतु येथील रस्त्यांची दुर्दशा बघता पायी वाहनांचे तर सोडाच, पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. अनेकदा किरकोळ अपघात घडलेत. महापालिकेला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे काय, असा सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत.
परिसरातील पथदिवेदेखील बंद आहेत. त्यामुळे परिसरात असामाजिक तत्त्व सक्रिय असतात. परिणामी चोऱ्यांचे प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रात्रीच्या वेळी या मार्गाने ये-जा करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
परिसरातील काही जागरूक नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे निवेदन, लेखी तक्रारी देऊन या भागातील समस्या सोडविण्याची मागणी केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी महापालिका प्रशासनाविरूद्ध सामान्य जनतेमध्ये रोष पसरला आहे.
या भागातील डीपी मार्गाची तातडीने सुधारणा करून पथदिवे बसवावेत, अशी मागणी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून गिरीधर गुल्हाने, मधुकर वडनेरकर, उमेश शेलोकार, रवि पोल्हाड, अतुल बोदडे, राजकुमार कनोजे, स्मिता डेरे, श्रीकृष्ण पळसकर, महेश पळसकर, सुरेश पोदार आदींसह शेकडो नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांची
तारेवरची कसरत
परिसरातील खड्डेमय रस्ते, अंधार आणि इतर समस्यांमुळे या भागातून अन्यत्र ये-जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. कित्येकदा विद्यार्थ्यांचे अपघातही होतात. त्यामुळे शाळेत अथवा ट्यूशनला गेलेला पाल्य परतेपर्यंत पालकांचा जीव टांगणीलाच राहतो.