अतिक्रमणधारकांच्या वाकुल्या

By Admin | Updated: April 30, 2016 00:20 IST2016-04-30T00:20:50+5:302016-04-30T00:20:50+5:30

शहरातील पदपथासह विविध मोक्याच्या ठिकाणी राजरोसपणे अतिक्रमण कायम असताना महापालिकेतील पथक मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.

Strangers of encroachment holders | अतिक्रमणधारकांच्या वाकुल्या

अतिक्रमणधारकांच्या वाकुल्या

आर्थिक बिदागीचा आरोप : महापालिकेचे पथक निद्रीस्त!
अमरावती: शहरातील पदपथासह विविध मोक्याच्या ठिकाणी राजरोसपणे अतिक्रमण कायम असताना महापालिकेतील पथक मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. त्यामुळे या पथकाकरिता आर्थिक बिदागी मिळत असल्याच्या आरोपाला बळ मिळत आहे.
मार्च अखेरपर्यंत पालिकेतील अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील विविध भागांत अतिक्रमण विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. यात अतिक्रमणधारकांवर फौजदारी कारवाई करण्यासोबतच काहींचे साहित्य जप्त, तर काहींवर दंडाचा बडगा उगारला गेला आहे. तथापि त्यानंतर एप्रिल महिन्यानंतर ही मोहीम पूर्णपणे थंडावली आहे.
शहरातील शामचौक, जयस्तंभ, चित्रा, सरोज, राजकमल चौकासह नमुना, राजापेठ, अंबागेट, गांधी चौक, नवाथे, विलासनगर, बडनेरा रोड, पंचवटी, मोर्शी रोड, उड्डाणपूल, गाडगे नगर, राठीनगर, राधानगर यांसह बापट चौक, नगर वाचनालय, इतवारा व बसस्थानक परिसर ही ठिकाणे अतिक्रमणधारकांचे हक्काचे आश्रयस्थान बनले आहे.
वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते संकुचित बनले असताना वाहतुकीचा बट्याबोळ रोजच्याच जगण्याचा एक भाग बनून राहिला आहे. शहरातील पदपथ दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी पदपथाची दारुण अवस्था झाली आहे. एखादा अपघात किंवा अनुचित घटना घडल्यास अतिक्रमणावर उपाययोजनांचा रतीब घातला जात आहे. तोंडदेखल्या कारवाया केल्या जात असून दोन दिवसांनंतर परिस्थिती जैसे थे, अशी स्थिती पहावयास मिळत आहे. ही समस्या कायमस्वरुपी निकाली काढणे शक्य होत नाही.

फूड झोनला वरदहस्त कुणाचा ?
नवाथे चौकासह नमुना, अंबागेट, गांधी चौक, शामनगर कॉर्नर, बसस्थानक ते रुख्मिणीनगरचा पदपथ आणि प्रशांतनगरच्या बगिच्यासमोरच्या भागाला अघोषित फुडझोनचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गणेश कुत्तरमारे यांच्या नेतृत्वातील पथकाने या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा असताना त्यांच्या मात्र कारवाई करण्यात कुणीही पुढे येत नाही. त्यामुळे या राजरोस अतिक्रमणाला आश्रय कुणाचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुख्मिणीनगरचे बसस्थानक मार्गावरील पदपथावर लागत असलेल्या हातगाड्यांवर तर अवैधरित्या दारू विक्री केली जाते. मात्र त्या अतिक्रमितांकांवर कुत्तरमारे यांच्या पथकाने कधी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.

पाठशिवणीचा खेळ
प्रचंड प्रसिद्ध आणि पोलिसी लवाजम्यात राणा भीमदेवी थाटात अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र दुसऱ्याच दिवशी तर काही भागात या पथकाची पाठ फिरताच अतिक्रमण ‘जैसे थे’ होेते. आपण संबंधित अधिकाऱ्याला महिन्याकाठी निश्चित अशी बिदागी देतो. त्यामुळे भीती कशाची, अशा आविर्भावात अतिक्रमणधारकांचा संवाद चालतो.

जीवघेणा खेळ
मध्यवर्ती बसस्थानकासह राजापेठ बसस्थानक परिसर वाहतुकीचा जीवघेणा खेळ सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अगदी रस्त्यावर हातगाड्या व अन्य अतिक्रमण थाटल्यामुळे हे मध्यवर्ती चौक मृत्यूचे पिंजरे बनले आहेत. पदपथावरून जायला जागा नाही. रस्ता आजूबाजूलाही फेरीवाल्यांचे अतिक्रमण, पादचाऱ्यांनी जायचे कुठून, असा प्रश्न असताना निव्वळ घोषणाबाजी करून उपाययोजनांची कागदावर अंमलबजावणी सुरू आहे.

आमसभेतही आवाज
शहरातील अतिक्रमणधारकांवर फौजदारी कारवाई करावी, शहरातील रस्ते अतिक्रमणयुक्त करावेत, अशी मागणी नगरसेवकांकडून वारंवार केली जाते. तथापि त्या प्रस्तावांवर कधीही फारशी चर्चा होत नाही. कारवाई सुरूच आहे, असे ठेवणीतील उत्तर देऊन प्रस्ताव हातावेगळा केला जातो. त्यामुळे अतिक्रमणावर कारवाई करण्याचा देखावा केला जात असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळत आहे.

Web Title: Strangers of encroachment holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.