वादळी पावसाचा हिरापूर गावाला जबर फटका

By Admin | Updated: June 27, 2016 00:14 IST2016-06-27T00:14:19+5:302016-06-27T00:14:19+5:30

तालुक्यातील गुरुवार २४ जून रोजी आलेल्या वादळी पावसाने शंभर ते दीडशे वर्षे जुनी असलेली अनेक वृक्ष उळमळून पडली,...

The storm surge of Hiralpur, | वादळी पावसाचा हिरापूर गावाला जबर फटका

वादळी पावसाचा हिरापूर गावाला जबर फटका

शेतीचेही नुकसान : अनेक घरांवरची टिनपत्रे उडाली
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील गुरुवार २४ जून रोजी आलेल्या वादळी पावसाने शंभर ते दीडशे वर्षे जुनी असलेली अनेक वृक्ष उळमळून पडली, तर हिरापूर, निमखेड, तवसाळा, खिराळा आदी गावांसह तालुक्यात १७८ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याशिवाय २५ हेक्टरवरील बागायती पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
मागील ४ दिवसांपासून दररोज तुरळक पावसाने शुक्रवारी सायंकाळी वादळ व विजेच्या कडकडाटासह रुद्ररुप धारण केले होते. २४ जून रोजी रात्रीच्या सुमारास अचानक वादळासह पावसाला सुरुवात झाली. या वादळाने अंजनगाव, अकोट मार्गावरील शहरी व्याप्त भागातील १०० ते १५० वर्षे जूनी आठ ते दहा कडूलिंबाची झाडे उळमळून पडल्याने रात्रभर मार्ग बंद होता. यासह अंजनगाव शहरासह हिरापूर येथील ११५ घरांचे तर निमखेड भागात येथील ३०, तवसाडा येथील १५, अंजनगाव शहरातील १० आणि खिराळा गावातील ८ अशा १७८ घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोबतच संत्रा व केळी उत्पादन शेतकऱ्यांचे सुमारे २५ हेक्टर वरील पिकांना या वादळाचा तडाका बसला आहे.
हिरापूर, निमखेड व परिसरात शुक्रवारी रात्री सुसाटाच्या वादळी वाऱ्यासह पावसाने अर्ध्यातासातच अनेक घरावरील टिनपत्रे, कवेलू व अन्य साहित्याच्या पार चुराळा केला आहे. या गांवामधील अनेक वृक्ष उळमळून पडल्यामुळे घरांच्या भिंती, विजेचे खांब, तार तुटून पडले आहेत. त्यामुळे या गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक घरांना या वादळाचा तडाका बसल्याने बरेच कुटुंब उघड्यावर आली आहेत. काही घरातील धान्य, कपडे व इतर साहित्यांचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेलगत असलेल्या हिरापूर येथील अंगणवाडी केंद्राचे शेड पूर्णता नेस्तनाबूत झाले आहे. याशिवाय काही वाहनांवरसुद्धा वृक्ष उळमळून पडल्यामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील टिनपत्रे, पीव्हीसी पाईप व इतर साहित्य वादळामुळे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत उडून गेली होती. विशेष म्हणजे या संकटात कुठलीही जीवित हानीची घटना सुदैवाने घडली नाही. या नुकसानीची माहिती अंजनगाव पंचायत समितीचे सभापती विनोद टेकाडे व हिरापूर येथील संरपच मिनल दखणे तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सदस्य यांनी महसूल विभागाला दिली.
दरम्यान तहसीलदार विजय चव्हाण, तलाठी गावंडे, ग्रामसेवक पवार, आदिंनी गावातील नुकसानीचे सर्व्हे करून पंचनामा केला. नुकसानग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सर्व गावकरी मदतीला धावले.
विशेष म्हणजे तालुक्यात या वादळी पावसाचा तडाका हिरापूर गावाला सर्वाधिक बसला आहे. त्यामुळे शासनाने नुकसान कुटूंबाना व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीने दखल
अंजनगाव सुर्जी तालुक्यात शुक्रवारी रात्री अचानक वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या दौऱ्यामुळे व्यस्त असतानाही नुकसानग्रस्त गावातील नुकसानीचे तातडीने संर्वेक्षण करण्याचे आदेश अंजनगावचे तहसीलदार यांना दिलेत. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येताच नुकसानग्रस्त गावाचे सर्र्वेक्षणाचे काम महसूल विभागाने पूर्ण केले आहे.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी महसूल यंत्रणेने पूर्ण केली असून अंजनगाव तालुक्यात झालेल्या नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत देण्यासाठी २६ जून रोजी तहसीलदार विजय चव्हाण यांना सूचना दिल्या आहेत. येत्या तीन दिवसांत नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप केले जाणार आहे.
किरण गीत्ते, जिल्हाधिकारी

Web Title: The storm surge of Hiralpur,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.