वादळाचा तडाखा, शेतकऱ्यांचा घास हिरावला
By Admin | Updated: March 1, 2015 00:18 IST2015-03-01T00:18:55+5:302015-03-01T00:18:55+5:30
शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह पाऊ स बरसला. बेसावधक्षणी आलेल्या वादळामुळे शेकडो घरांवरील टिनपत्रे उडाली.

वादळाचा तडाखा, शेतकऱ्यांचा घास हिरावला
अमरावती : शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह पाऊ स बरसला. बेसावधक्षणी आलेल्या वादळामुळे शेकडो घरांवरील टिनपत्रे उडाली.वीज कोसळल्याने दर्यापूर तालुक्यातील उमरी येथे एका महिलेचा मृत्यू झाला. अवकाळी पावसाचा फटका रबी पिकांना बसला संत्राबागेतील मृग बहाराची संत्री झडली. चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, दर्यापूर, वरुड, धारणी तालुक्यांत वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. अनेक गावे काळाखात बुडाली. हे अस्मानी संकट शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून गेले.
वादळी पावसाचे दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्ह्यात आगमन झाले. दर्यापूर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे प्रचंड हानी झाली.
पोटाची खळगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून उमरी येथे आलेल्या महिलेचा वीज अंगावर कोसळून जागीच मत्यू झाला. मृत महिलेचे नाव कुमरजी पुनाजी कास्देकर (४० रा. भार, जि. बैतुल) असे आहे. ही महिला नंदू लोहिया यांच्या शेतात कामासाठी गेली असताना अचानक वीज पडून तिचा मृत्यू झाला. तिची मुलगी बबली पूनाजी कास्देकर ही सुध्दा भाजली.
कापणीला आलेल्या गहू व हरभरा पिकांनाही पावसाचा तडाखा बसला. दर्यापूर-अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्याजवळ सहा ते सात झाडे वादळामुळे उन्मळून पडली.
येवदा येथेही वादळी पाऊस कोसळला. धामणगाव रेल्वे तालुक्यात वादळी पावसाचे दुपारी ४ वाजताच्या सुमारास आगमन झाले. वादळामुळे तालुक्यात मोठी हानी झाली. या पावसाचा सर्वाधिक फटका रबी पिकांना बसला.
उमरी येथे
दोघांचा मृत्यू
दर्यापूर तालुक्यातील उमरी ममदाबाद येथे वीज पडून एका महिलेसह दहावीत शिकणाऱ्या गौरव सुधाकर हंबर्डे याचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. पाऊ स येत असताना तो शेंगा काढण्यासाठी घरावर चढला होता.
तळेगावात तासभर वादळ
धामणगावरेल्वे तालुक्यातील तळेगावदशासर, ढाकुलगाव येथे बोराच्या आकाराची गार पडली. तब्बल तासभर वादळ चालले. वादळामुळे घरावरील टिनपत्रे उडाली.
हरभऱ्याच्या
गंज्या उडाल्या
भातकुली, गणोरी, टाकरखेडा संभू, आष्टी, कामनापूर, देवरी, मक्रमपूर, मार्की, साऊर, कळमगव्हाण, जळका हिरापूर, लसनापूर येथे शेतात सवंगून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंज्या वादळामुळे उडाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
काळोखात बुडाली गावे
वादळाच्या तडाख्यामुळे मार्गावरील झाडे खाली कोसळल्याने विद्युत तारा तुटल्याने काळोख पसरला आहे. मेळघाटातील गावेही अंधारात होती.
मृगबहराची संत्री गळाली
शेतकऱ्यांचे रोख रकमेचे पीक असणाऱ्या संत्र्याच्या मृग बहाराची संत्री वादळामुळे खाली आली. यामुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला. कारण यंदा संत्राउत्पादक शेतकऱ्यांची भिस्त मृग बहारावर होती. परंतु निसर्गाने मारल्यामुळे शेतकरी आता कोलमडला आहे. मदतीची नितांत गरज आहे.
शेतकऱ्यांच्या मागे संकटांची मालिका
दोन आठवड्यानंतर पुन्हा वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला. सर्वाधिक नुकसान गहू व संत्रा पिकाचे झाले. जिल्ह्यात सर्वत्र ऊं बीवर आलेला गहू झोपला.