शकुंतलेची दुरवस्था थांबवा !
By Admin | Updated: November 1, 2015 00:19 IST2015-11-01T00:19:47+5:302015-11-01T00:19:47+5:30
मूर्तिजापूर-अचलपूरदरम्यान धावणारी शकुंतला ही दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील जनतेची जीवनवाहिनी असून तिची होत असलेली दुरवस्था थांबवा,

शकुंतलेची दुरवस्था थांबवा !
अन्यथा रेल रोको : दर्यापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर येणार
उमेश होले दर्यापूर
मूर्तिजापूर-अचलपूरदरम्यान धावणारी शकुंतला ही दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील जनतेची जीवनवाहिनी असून तिची होत असलेली दुरवस्था थांबवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दर्यापूरच्यावतीने तालुकाध्यक्ष जयंत वाकोडे यांनी भुसावळ रेल्वे विभागीय प्रमुख गुप्ता यांचेकडे केली आहे.
शकुंतला रेल्वेची सध्या दयनीय स्थिती झाली आहे. तिला सुस्थितीत आणावे, अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.
जनतेच्या सेवेसाठी असलेली भारतीय रेल्वे या मार्गानी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दर्यापूर येथील रेल्वे स्टेशनची अवस्था बिकट झाली असून इमारतीला भग्न स्वरूप प्राप्त झाले आहे. दिवे बंद, कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे. स्वच्छ व सुंदर रेल्वेची जाहिरात करणाऱ्या भारत सरकारला या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना येथे प्राथमिक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे वाटत नाही का, असा सवाल जयंत वाकोडे यांनी उपस्थित केला.
यावेळी या नॅरोगेज रेल्वे लाईनचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करा, येथील रेल्वे स्टेशन तत्काळ कार्यान्वित करा, त्याप्रमाणे आरक्षण खिडकी सुरू करा, सुरक्षा रक्षक, टिसींची नियुक्ती करा अशा विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना दर्यापूर तालुक्याच्यावतीने विभागीय प्रमुख गुप्ता यांना शनिवारी देण्यात आले. याचा विचार न केल्यास रेल रोको आंदोलन केले जाईल, असा गर्भीत इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी अनिल भुसारी (प्रभारी शहराध्यक्ष), प्रवीण पाटील (तालुका प्रसिद्धी प्रमुख), रणजित धर्माळे, शरद विल्हेकर, अमोल चांदुरकर, शक्ती ठाकूर, अनिल राऊत, पप्पू पाटील बायस्कार, गजानन कपिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.