सणासुदीच्या काळात तरी रेल्वेची "स्पेशल" लूट थांबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST2021-09-08T04:18:33+5:302021-09-08T04:18:33+5:30
बडनेरा( श्यामकांत सहस्त्रभोजने) कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी कमी झाली आहे. अलीकडे रेल्वे गाड्यांची व प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे. सध्या ...

सणासुदीच्या काळात तरी रेल्वेची "स्पेशल" लूट थांबवा!
बडनेरा( श्यामकांत सहस्त्रभोजने)
कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी कमी झाली आहे. अलीकडे रेल्वे गाड्यांची व प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्याने बऱ्याच लोकांना गावी जायचे असते. विशेष रेल्वे गाड्यांचा प्रवास महागडा झाला आहे. कोरोनाने आधीच आर्थिक संकट वाढविले आहे.
दीड वर्षापासून फेस्टिवल तसेच कोविड विशेष रेल्वेगाड्या रूळावर धावत आहेत. आधीच्या तुलनेत प्रवाशांना तिकीटासाठी जास्तीचा पैसा मोजावा लागत आहे. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहे. त्यांना बसेस तसेच खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. त्यापोटी अतिरिक्त पैसा मोजावा लागत आहे. प्रामुख्याने शासकीय-निमशासकीय, खासगी कामानिमित्त इतर जिल्ह्यातून अमरावतीत कामानिमित्त दररोज येणाऱ्यांना रेल्वेचा प्रवास प्रचंड महागडा ठरत आहे. पासेस बंद असल्याने महिन्याकाठी पैसे मोजावे लागत आहे. रेल्वे मंत्रालयाने पूर्वीप्रमाणेच भाडे आकारणी करावी, अशा प्रतिक्रिया आहेत. पॅसेंजर सुरू झाल्यास नियमित प्रवास करणारे तसेच सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. आधीच कोरोनामुळे लोक आर्थिकदृष्ट्या त्रस्त आहेत.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
बॉक्स:
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन्स
* अमरावती- मुंबई
* हावडा- अहमदाबाद
*गोंदिया- कोल्हापूर
*हटिया एक्सप्रेस
* गोंदिया- मुंबई
* नागपूर- पुणे
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
अधिक भाडे कधीपर्यंत सहन करणार?
* विशेष रेल्वे गाड्यांमुळे बडनेरा ते अकोला स्लीपर कोचचे भाडे ४२५ रुपये द्यावे लागत आहे. कोरोना आधी केवळ ९० रुपये होते. ही तफावत तिकीटदरात निर्माण झालेली आहे.
* बडनेरा ते धामणगाव रेल्वे पर्यंत स्लीपरकोच चे भाडे सध्या १८५ रुपये आहे कोरोनाच्या आधी केवळ ४५ रुपये भाडे होते भाड्यांमधील मोठी तफावत रेल्वे प्रवाशांसाठी आर्थिक दृष्ट्या महागडी ठरत आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
जनरल डबे कधी सुरू होणार?
कोरोनाच्या आधी सर्वच एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी जनरल डबे उपलब्ध होते आता विशेष रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यांचे रूपांतर आरक्षण श्रेणीत करण्यात आले आहे पूर्वीप्रमाणेच जनरल डबे असावेत ज्यामुळे प्रवाशांना आर्थिक दृष्ट्या अधिक सोयीचे ठरेल आरक्षण करूनच टिकीट काढावे लागत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागते आहे तेव्हा जनरल डबे सुरू करावे अशी मागणी प्रवासी वर्गातून पुढे येत आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
''स्पेशल'' भाडे कसे परवडणार?
शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रात काम करणारे रेल्वेने प्रवास करतात सध्या पासेस बंद आहेत अशा प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे, पासेस सुरू झाल्या पाहिजेत.
- उदय देशमुख,
प्रवासी, अकोला.
मी दररोज बडनेरा ते चंद्रपूर पर्यंत रेल्वेने प्रवास करते विशेष रेल्वे गाड्यांचे भाडे भरमसाठ आहे रेल्वे प्रशासनाने पासेस सुरू केल्यास दिलासादायक ठरेल अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.
- सायली सहारे,
प्रवासी, बडनेरा.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^