राजकीय विरोधामुळे नरसरी गावाची होणारी बदनामी थांबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST2021-03-21T04:13:00+5:302021-03-21T04:13:00+5:30
अचलपूर : गौरखेडा कुंभी गट ग्रामपंचायत अंतर्गत नरसरी गावाची बदनामी राजकीय हेतूने प्रेरित काही ग्रामपंचायत सदस्य करीत असल्याचा आरोप ...

राजकीय विरोधामुळे नरसरी गावाची होणारी बदनामी थांबवावी
अचलपूर : गौरखेडा कुंभी गट ग्रामपंचायत अंतर्गत नरसरी गावाची बदनामी राजकीय हेतूने प्रेरित काही ग्रामपंचायत सदस्य करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही बदनामी थांबविण्याचे निवेदन अचलपूरचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी परतवाडा तथा गौरखेडा कुंभीच्या ग्रामपंचायत सचिवांना देण्यात आले.
नरसारी गावातील स्मशानभूमीलगत असलेले तळे, ज्यात पाण्याचा कुठलाही स्रोत नव्हता, पावसाळ्यात त्या शेततळ्यात पाणी जमा होत नव्हते तसेच त्यात व आजूबाजूला काटेरी झुडपे अवास्तव वाढलेली होती. या तळ्यात रानडुकरांचा मुक्काम असल्यामुळे लगतच्या शेतातील पिकांचे नुकसान होत होते. विशेष म्हणजे, या तळ्याचा कोणताही फायदा गाववासीयांना होत नव्हता. त्यामुळे गावातीलच तरुण मंडळींनी सर्वांना विश्वासात घेऊन तळ्याची साफसफाई करून भरती टाकली. काटेरी झुडपे कापून त्या ठिकाणी खेळण्याचे मैदान बनविण्याचे ठरविले. त्याच प्रमाणे मैदानाच्या आजूबाजूला वृक्षारोपण करून फायदेशीर वृक्ष लावण्याचे ठरविले. तळ्यातील तोडलेली काटेरी झुडपे, बाभळी स्मशानभूमीला देण्यात आली. तरुणांनी लोकवर्गणी करून तळ्याच्या ठिकाणी मैदान बनविले. त्या ठिकाणी तरुण मंडळी खेळू लागली. मात्र, विरोधी पक्षाच्या राजकीय मंडळींनी याची तक्रार ग्रामपंचायतीमध्ये नोंदविली. त्यामुळे चांगले कामे केलेल्या तरुणांची व गावाची बदनामी झाली. ही खोटी बदनामी थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.