रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांनाच अडथळा
By Admin | Updated: June 3, 2015 00:30 IST2015-06-03T00:30:10+5:302015-06-03T00:30:10+5:30
शहरातील विस्कळीत वाहतूकीमुळे रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाच्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.

रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांनाच अडथळा
अत्यावश्यक सेवेला फटका : सिग्नलवर थांबतात वाहने
अमरावती : शहरातील विस्कळीत वाहतूकीमुळे रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाच्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. दररोज आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज असणारी वाहने सिग्नलवरील अस्तव्यस्त वाहतुकीमुळे मध्यच थांबत आहेत. याबाबत प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांकडूनही सहकार्य मिळत नसल्याने वाहनचालकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी सत्वपरीक्षाच द्यावी लागत आहे.
कोणतीही घटना सांगून येत नाही, असे म्हटले जाते. मात्र, घटना घडल्यानंतरही आतप्कालीन स्थितीत सज्ज असणाऱ्या वाहनांना सुरक्षित घटनास्थळी पोहोण्यास मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत. जिल्ह्यात दररोज विविध घटना घडतात, कुठे अपघात तर कुठे आग लागल्याच्या घटना सुरुच असतात. अशा स्थितीत रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाच्या वाहनांना वेळेत पोहोचणे गरजेचे असते. मोठ्या तत्परतेने रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी पोहोचण्यासाठी धडपड करतात. लवकरात लवकर मदत करण्याचा त्यांचा उद्देश असतो. मात्र, शहरातील विस्कळीत वाहतुकीमुळे आपत्कालीन वाहने तत्काळ घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नसल्याची विदारक स्थिती शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील राजकमल व राजापेठ या दोन्ही वर्दळीच्या मुख्य चौकात दिवसभर वाहनांची ये-जा सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
शहरातील अस्तव्यस्त वाहतूक व सिग्नलवर थांबणारी वाहने आपत्कालीन स्थितीसाठी अडथळा निर्माण करतात. शहरात गतिरोधकांची संख्या अधिक असल्यामुळे अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण होते. याकडे प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.
- भरतसिंग चव्हाण,
प्रभारी अधीक्षक, अग्निशमन विभाग.
रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने रुग्णवाहिका वेगाने न्यावी लागते. मात्र, अस्तव्यस्त वाहतूक व गतिरोधकांमुळे रुग्णांचे हाल होतात. सिग्नलवर नेहमीच वाहनांचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका रुग्णालयात तत्काळ पोहोचून शकत नाही. अशावेळी रुग्णांचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
- अभिजित देशपांडे,
रुग्णवाहिका चालक.