व्याघ्र प्रकल्पांत पाणवठ्यांवर ‘जागते रहो’
By Admin | Updated: February 9, 2016 00:23 IST2016-02-09T00:23:24+5:302016-02-09T00:23:24+5:30
जेमतेम उन्हाळा सुरु झाला असला तरी विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाणवठ्यांवर वाघांची शिकार करण्याची रणनिती तस्करांनी आखल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली आहे.

व्याघ्र प्रकल्पांत पाणवठ्यांवर ‘जागते रहो’
वाघ शिकारीची शक्यता : मेळघाटात ६०० नैसर्गिक तर ३५० कृत्रिम पाणवठे
अमरावती : जेमतेम उन्हाळा सुरु झाला असला तरी विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाणवठ्यांवर वाघांची शिकार करण्याची रणनिती तस्करांनी आखल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली आहे. त्यानुषंगाने व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांवर ‘जागते रहो’च्या सूचना वन कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. व्याघ्र संरक्षण दल सीमेवर बारकाईने पाळत
ठेऊन आहे.
विदर्भात मेळघाट, ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पांसह बोर, टिपेश्वर या अभयारण्यात वाघ आणि बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पाबाहेर म्हणजेच संरक्षित क्षेत्र ओलांडून वाघांचे अस्तित्व दिसून येत असल्याने वन्यजीव विभागासाठी ही चिंतनीय बाब आहे. मागिल महिन्यात आंतरराज्यीय तस्कर कुट्टू पारधी हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्यामुळे व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. १ फे ब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. नैसर्गिक पाणवठ्यांची स्थिती फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात वाघांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. उन्हाळा सुरु होताच विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात सोलर, हातपंप अथवा टँकरने पाणवठ्यात पाणी सोडून वन्यपशुंची तृष्णा भागविण्याचे नियोजन केले जाते. मात्र, यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्यासाठी वन्यपशुंचे हाल होण्याची शक्यता आहे. नेमकी हिच बाब हेरुन तस्करांनी पाणवठे लक्ष्य केल्याची गोपनीय माहिती वनविभागाच्या हाती लागली आहे.
नैसर्गिक अथवा कृत्रिम पाणवठ्यात युरिया, विष आदी पदार्थ कालवून वाघांसह अन्य वन्यपशुंची शिकार करण्याची खेळी तस्कर करीत आहेत. तस्करांना उन्हळ्यात वाघांची शिकार करणे अगदी सोपे जात असल्यामुळे व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावात तस्करांचे धागेदोरे असल्याची माहिती आहे. मेळघाटात वाघांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. व्याघ्र संरक्षण दल, वायरलेस यंत्रणा आणि वनकर्मचाऱ्यांना सज्ज करण्यात आले आहे. पाणवठ्यांची नियमित तपासणी करुन वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
बीटनिहाय पाणवठ्यांची जबाबदारी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आदी माहिती व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांकडे पाठविण्यात आली आहे. पाणवठ्यात विष कालवून अथवा जंगलात आगी लाऊन वन्यपशुंच्या शिकारींचे तस्करांचे मनसुबे असल्याच्या पार्श्वभूमिवर वनकर्मचाऱ्यांना ‘अलर्ट’ करण्यात आले आहे.
पाणवठ्यांमध्ये विष कालवून सहजतेने वाघांची शिकार झाली की तस्कर कातडी व अन्य अवयव काही क्षणातच गायब करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणवठ्यावर वाघांची शिकार रोखण्यासाठी वनविभाग सज्ज झाला आहे. अमरावती वनविभागांतर्गत येणाऱ्या पोहरा, चिरोडी, माळेगाव, वडाळी, परतवाडा, वरुड, मोर्शी आदी भागात वन्यपशुंची संख्या मोठी असल्याने पाणवठ्यांवर विष प्रयोगाची शक्यता लक्षात घेता संपूर्ण यंत्रणेला दक्ष राहण्याच्या सूचना आहेत. पाणवठ्याबाबत मिळालेल्या सूचनेुसार वनकर्मचाऱ्यांनी गस्त वाढविली आहे. तसेच व्याघ्र संरक्षण दलाने सीमेवर सूक्ष्म नजर ठेवली आहे. (प्रतिनिधी)
मचानावरुन तस्करांवर नजर
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यावर वाघांचे संरक्षण करण्यासाठी बांबू, लाकडाच्या मचानी (वॉच टॉवर) तयार करण्यात आल्या आहेत. या मचानींवरुन वन कर्मचारी दुर्बिणीद्वारे वाघांचे संरक्षण करताना तस्करांवर नजर ठेवणार आहेत. या मचानी जानेवारीत तयार करण्यात आल्या असून सिपना, अकोट, व गुगामल वन्यजीव विभागात तस्करांवर पाळत ठेवली जात आहे.
उन्हाळ्यात पाणवठे ठरतात कर्दनकाळ
दरवर्षी उन्हाळ्यात पाणवठ्यात विष कालवून वाघांच्या शिकारींच्या घटना घडतात. पाणवठ्यावर शिकार झालेल्या वन्यपशुंच्या अवयवांची सहजतेने विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे तस्कर उन्हाळ्याची आतुरतेने प्रतीक्षा करतात. उन्हाळ्यातच वाघांच्या शिकारींचे प्रमाण वाढीस लागते, अशी माहिती आहे.
मेळघाटात ६०० नैसर्गिक तर ३५० कृत्रिम पाणवठ्यांवर पाळत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी तपासणीचे आदेश असून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पाणवठ्यात विष कालवून वाघांची हत्या होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या पाणवठ्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे. मात्र, उन्हाळ्यात काळजी घ्यावी लागेल.
-दिनेश त्यागी,
क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.