प्रलंबित मागण्यांसाठी विधानसभा अध्यक्षांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:24+5:302021-04-06T04:12:24+5:30
महाराष्ट्र राज्य पोलीसपाटील संघटना चांदूर बाजार : राज्यातील पोलीसपाटील संघटनेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता महाराष्ट्र ...

प्रलंबित मागण्यांसाठी विधानसभा अध्यक्षांना निवेदन
महाराष्ट्र राज्य पोलीसपाटील संघटना
चांदूर बाजार : राज्यातील पोलीसपाटील संघटनेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता महाराष्ट्र राज्य पोलीसपाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे यांनी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.
ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीसपाटील ग्रामस्तरावर कार्य करीत असतो. परंतु, कामाच्या तुलनेत त्यांना मिळणारे मानधन कमी आहेच, सोबतच अनेक वर्षांपासून पोलीसपाटलांच्या प्रलंबित मागण्या शासनदरबारी पडून आहेत. या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना निवेदन देण्यात आले. पोलीसपाटलांचे मानधन १५,००० रुपये करणे, नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करणे, निवृत्तीनंतर एकरकमी ठोक रक्कम देऊन केलेल्या सेवेचा सन्मान करणे, नवीन पदभरतीमध्ये पोलीसपाटील यांच्या पाल्यांना प्रथम प्राधान्य देणे, महाराष्ट्र राज्य पोलीसपाटील अधिनियम १९६७मध्ये सुधारणा करून या समितीच्या अध्यक्षपदी नागरगोजे पाटील यांची नियुक्ती करणे, सेवानिवृत्त वयोमर्यादा ६० वरून ६५ करणे आणि गतवर्षी ३ डिसेंबर रोजी विधानभवनात पार पडलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मागण्या पूर्ण करण्यात याव्या आदी मुद्दे निवेदनात मांडण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहुल उके, राज्य प्रसिद्धीप्रमुख निरंजन गायकवाड, चांदूर बाजार तालुकाध्यक्ष श्रीनिवास तायडे उपस्थित होते. लवकरच सर्व मागण्या पूर्णत्वास नेण्यात येतील, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पोलीसपाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.