राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रविवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST2021-04-07T04:12:40+5:302021-04-07T04:12:40+5:30
अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ही रविवार, ११ एप्रिल रोजी होणार आहे. अमरावती ...

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रविवारी
अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ही रविवार, ११ एप्रिल रोजी होणार आहे. अमरावती शहरातील ४८ शाळा, महाविद्यालयांत या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षार्थींना हॉल तिकीट पाठविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने एमपीएससी परीक्षांची तयारी चालविली आहे.
अमरावती विभागातून या परीक्षेसाठी १४ हजार ५४४ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या दरम्यान एकाच सत्रात परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या नियोजनासाठी १२ समन्वय अधिकारी, दोन भरारी पथक प्रमुख, ४८ केंद्रप्रमुख, १८७ पर्यवेक्षक, ६८० समवेक्षक, ९६ लिपिक व ९६ शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत. उमेदवारांना मास्क, ग्लोव्हज्, सॅनिटायझर पाऊच आयोगामार्फत पुरविण्यात येणार आहेत. कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी प्रशासनाने सूचना निर्गमित केल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात एमपीएससी परीक्षा होणार असल्याने परीक्षार्थी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे परीक्षा केंद्रावर कर्तव्यावर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी येथील बचत भवनात मंगळवारपासून प्रारंभ झाली आहे. संक्रमित आढळल्यास ते कर्मचारी कर्तव्यातून बाद होतील, अशी माहिती आहे.
----------------
शासन मार्गदर्शक तत्त्वानुसार एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात येतील. त्यानुसार तयारी सुरू असून, कर्तव्यावरील मनुष्यबळाचे नियुक्ती आदेश जारी केले आहेत. कोरोना चाचणीशिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांना केंद्रावर परवानगी नाही.
- नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.