राज्यातील महापालिकांना ‘स्वच्छ’ वॉर्ड स्पर्धेच्या निकालाचे ‘टेन्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 12:25 IST2018-03-16T12:24:55+5:302018-03-16T12:25:05+5:30
राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषद व नगरपंचायतमध्ये १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली. त्यामुळे चार हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणापाठोपाठ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छ वॉर्ड स्पर्धेच्या निकालाचे ‘टेन्शन’ आले आहे.

राज्यातील महापालिकांना ‘स्वच्छ’ वॉर्ड स्पर्धेच्या निकालाचे ‘टेन्शन’
प्रदीप भाकरे
अमरावती : राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषद व नगरपंचायतमध्ये १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ पाठोपाठ या स्पर्धेत उत्तम मानांकन मिळाल्यास प्रत्येक स्वच्छ प्रभागांवर लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. त्यामुळे चार हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणापाठोपाठ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छ वॉर्ड स्पर्धेच्या निकालाचे ‘टेन्शन’ आले आहे. दैनंदिन स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापानाबाबत यथातथा असणाऱ्या विदर्भातील बहुतांश महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांना निकालाची प्रतीक्षा लागून राहिली असून, या दोन्ही स्पर्धेच्या यशापयाशावर त्यांचा ‘सीआर’ ( वार्षिक गोपनिय अहवाल) अवलंबून आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी होण्यास लोकांना उद्युक्त करणे, हगणदारीमुक्त व स्वच्छता याबाबत शहरांची क्षमता कायमस्वरूपी वाढविणे तसेच स्वच्छ महाराष्ट्राच्या दिशेने वाटचालीत समाजातील सर्व घटकातील लोकांचा सांघिक सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा राबविण्यात आली.
शहराचे ‘स्वच्छ’ मानांकन ठरविणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाची तपासणी ४ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत आटोपली. त्यासोबतच नागरी स्थानिक संस्थांमध्ये ‘स्वच्छ वॉर्ड स्पर्धा’ घेण्यात आली. स्पर्धेत शहरातील प्रत्येक वॉर्डाचा सहभाग अनिवार्य होता. त्यानुसार संबंधित नगरसेवकांना विश्वासात घेऊन या स्पर्धेविषयी प्रथम जनजागृती करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षणाची तयारी जोरात सुरू असताना वॉर्डावॉर्डात ‘स्वच्छ वॉर्ड’ स्पर्धेची माहिती देण्यात आली. सोबतच स्पर्धेच्या निकषांप्रमाणे मोहिम राबविण्यात आली. त्याचा निकाल एप्रिलमध्ये लागणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणाव्यतिरिक्त दुसऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रशासन मात्र चांगलेच घायकुतीस आले होते. या स्पर्धेत प्रत्येक वॉर्डाला सहभागी होणे अनिवार्य असल्याने प्रत्येक नगरसेवकाचीही मदत घेण्यात आली.
‘अ’ व ‘ब’ वर्ग महापालिका क्षेत्रातील प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ वॉर्डाला अनुक्रमे ५० लाख, ३५ लाख व २० लाख रुपये मिळतील. ‘क’ व ‘ड’ वर्ग महापालिकांना ३० लाख, २० लाख व १५ लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे. या स्पर्धेचे त्रयस्थ यंत्रणेकडून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतर स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचे मानकरी ठरतील.
असे होईल गुणांकन
घरोघरी जाऊन कचरा संकलन पद्धती अवलंबविणाऱ्या घरांचे प्रमाण, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, वॉर्डात ओल्या कचऱ्यावर विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया, नेहमी कचरा दिसणाऱ्या ठिकाणचे सुशोभीकरण, सर्व घरांमध्ये वैयक्तिक शौचालये, सामुदायिक, सार्वजनिक शौचालयांची स्थिती, नगरसेवकांनी घेतलेले जनजागृती कार्यक्रम, श्रमदान, १०० टक्के मालमत्ता कर संकलन, वॉर्डातील प्लास्टिक बंदीची स्थिती, स्वच्छतेबाबत फलके, लोकसहभाग या विविध निकषांवर त्रयस्थ संस्था स्वच्छ प्रभागाचे गुणांकन करणार आहे.