अमरावतीला राज्यस्तर कृषी विकास प्रदर्शनी

By Admin | Updated: March 23, 2015 00:29 IST2015-03-23T00:29:03+5:302015-03-23T00:29:03+5:30

कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून

State level Agricultural Development Exhibition at Amravati | अमरावतीला राज्यस्तर कृषी विकास प्रदर्शनी

अमरावतीला राज्यस्तर कृषी विकास प्रदर्शनी

अमरावती : कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून १० ते १३ एप्रिलदरम्यान येथील सायन्सकोर मैदानावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत विभागातील निवडक १०० बचतगटांचा सहभाग राहिल. शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या १६ कार्यशाळा या तीन दिवसांत होणार असल्याची माहिती कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी रविवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कृषिक्रांतीचे प्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेला हा विभाग आहे. एकीकडे संत्राबागांमुळे कॅलिफोर्निया अशी ओळख निर्माण झालेल्या या विभागाने शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्रही अनुभवले आहे. बहुतांश कोरडवाहू आणि निसर्गावर अवलंबून असणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांसाठी शाश्वत असे सहाय्यभूत जाळे विकसित करण्याची गरज आहे. सरकारी सहाय्यासोबतच नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन या भागाचा विकास साधला जाऊ शकतो. कृषी विकासच्या माध्यमातून आयोजित प्रदर्शन, कार्यशाळा, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या अनुभवांचे कथन, विचारांचे आदानप्रदान, तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला यामधून कायम संघर्षरत असलेल्या या भागातील शेतकऱ्यांना नवीन ऊर्जा व बळ मिळू शकेल, असे गांधी म्हणाले.
प्रदर्शनीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १० एप्रिलला होणार आहे. यावेळी ना. प्रवीण पोटे, ना.संजय राठोड, ना. रणजित पाटील उपस्थित राहतील. ‘जलयुक्त शिवार’ या ११ एप्रिलला आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. कृषी प्रदर्शनीच्या समारोपाला १३ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व या विषयाशी संबंधित राज्य शासनाचे सर्व मंत्री तसेच विदर्भातील सर्व खासदार व आमदार उपस्थित राहतील, अशी माहिती प्रदर्शनीचे संयोजक सोमेश्वर पुसतकर यांनी दिली. पत्रपरिषदेला विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सी.डी. मायी, निवेदिता चौधरी (दिघडे), कृषी विकास प्रतिष्ठानचे किशोर कान्हेरे, मनोज वाडेकर, अजय पाटील, सुधीर जगताप, रमेश बोरकुटे, रामेश्वर अभ्यंकर, हरिभाऊ मोहोड आदी उपस्थित होते.

Web Title: State level Agricultural Development Exhibition at Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.