राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा - नवनीत राणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST2021-07-09T04:09:51+5:302021-07-09T04:09:51+5:30
पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आलेल्या बळीराजाला राज्य शासनाने भरभक्कम आधार द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्या गुरुवारी अमरावती ...

राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा - नवनीत राणा
पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आलेल्या बळीराजाला राज्य शासनाने भरभक्कम आधार द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्या गुरुवारी अमरावती व चांदूर बाजार तालुका दौऱ्यावर आहेत. त्यांनी ठिकठिकाणी शेतीपिकांची पाहणी केली. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वना केली. गोपाळपूर येथील राजकुमार गंगोले हे भूमिहीन शेतकरी रखवाली करीत असताना विजेच्या धक्क्याने दगावले. त्यांच्या पश्चात २ मुले व मुलगी आहे. अंगोला, टाकळी जहागीर येथील गजानन महादेवराव बोधडे (४०) यांचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असून, ते साडेतीन एकर शेतीच्या भरवशावर जगत आहे. या दोन्ही कुटुंबीयांना वीज वितरण कंपनीने तत्काळ मदत द्यावी, असे निर्देश खासदार नवनीत राणा यांनी मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांना दिले.
शिराळा येथील मनोहर शंकर गोडगोमे यांनी २२ जून रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन लहान मुली आहेत. त्यांच्याकडे ५ एकर शेती असून, त्यांचेवर बँक ऑफ बडोदाचे ३ लाखांचे कर्ज होते. या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. आकस्मिक मृत्यू झालेल्या नीलेश गभने यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. चांदूर बाजार तालुक्यातील बेसखेडा येथील १० एकर शेती असलेल्या सचिन वाटाणे यांनी तहसीलदार कार्यालयात विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या कुटुंबियांचीसुद्धा खा.राणा यांनी भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या दौऱ्यात जिप सदस्य प्रकाश साबळे, तहसीलदार काकडे, तालुका कृषी अधिकारी कावने, मंडळ अधिकारी गावणेर, चांदूर बाजारचे नायब तहसीलदार बढिये, मंडळ अधिकारी उगले, सरपंच महल्ले, पवन बैस, चंदा लांडे, सचिन सोनोने, मंगेश कोकाटे, हरकूट, सागर पारधी, आशुतोष मोहोड, प्रीतम काळे, राजेश सुंडे, अनिल शेळके आदी उपस्थित होते.