२८ जूनपासून ११ वी प्रवेशाचा मुहूर्त
By Admin | Updated: June 25, 2014 00:09 IST2014-06-25T00:09:31+5:302014-06-25T00:09:31+5:30
इयत्ता ११ वीच्या केंद्रीय प्रवेश समितीद्वारे महापालिका क्षेत्रात कला, वाणिज्य, विज्ञान व द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश दरवर्षीप्रमाणेच यंदाही करण्यात येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना

२८ जूनपासून ११ वी प्रवेशाचा मुहूर्त
अर्जांसाठी धावपळ : केंद्रीय समितीचे गठन
अमरावती : इयत्ता ११ वीच्या केंद्रीय प्रवेश समितीद्वारे महापालिका क्षेत्रात कला, वाणिज्य, विज्ञान व द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश दरवर्षीप्रमाणेच यंदाही करण्यात येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना २७ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहेत. २७ ते ३० जूनपर्यंत कॅम्पस, मॉनिटरिंग प्रवेशाकरिता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
इयत्ता दहावीचा निकाल लागताच विद्यार्थ्यांमध्ये ११ वीच्या प्रवेशाकरिता चढाओढ पाहायला मिळत आहे. यंदाही शिक्षण मंडळातर्फे केंद्रीय पध्दतीने प्रवेश देण्यात येणार आहे. शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने येथील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयात बैठक पार पडली. यामध्ये केंद्रीय समिती गठित करण्यात आली. येत्या २८ जूनपासून ११ वीच्या प्रवेशाचा मुहुर्त सुरु होणार आहे.
११ वीत प्रवेशाकरिता यंदाही विध्यार्थ्यांची धावपळ सुरु झाली. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ओढ शहरातील नामांकीत महाविद्यालयांकडे अधिक दिसून येत आहे. दहावीत उतीर्ण विद्यार्थ्यांना गुरुवारी गुणपत्रिका मिळणार आहे. यावर्षी जिल्ह्यात ३५ हजार ८८२ विद्यार्थी दहावीत उतीर्ण झाले असून यामध्ये १८ हजार ४०३ मुले तर १७ हजार ४७९ मुलींचा सहभाग आहे. ११ वीच्या प्रवेशाकरिता जिल्ह्यात २६२ शिक्षण संस्था असून त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त अशा ४३१ तुकड्या आहेत. त्यामध्ये ११ वी प्रवेशाकरिता ३४ हजार ४८० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, अनुदानित व विनाअनुदानित संस्थांचा सहभाग आहे.