बेलोरा विमानतळाच्या माती परीक्षणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:14 IST2018-09-28T22:13:32+5:302018-09-28T22:14:30+5:30
बेलोरा विमानतळाहून भविष्यात प्रवासी विमाने ‘टेक आॅफ’ आणि ‘लॅण्डिंग’ होण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात विमानतळाचे माती परीक्षण होत असून, प्रयोगशाळेत माती नमुने तपासणीसाठी पाठविले जातील.

बेलोरा विमानतळाच्या माती परीक्षणास प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बेलोरा विमानतळाहून भविष्यात प्रवासी विमाने ‘टेक आॅफ’ आणि ‘लॅण्डिंग’ होण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात विमानतळाचे माती परीक्षण होत असून, प्रयोगशाळेत माती नमुने तपासणीसाठी पाठविले जातील. हा अहवाल प्राप्त होताच विकासकामांची संरचना (डिझाईन), नियोजन (प्लॅनिंग) निश्चित होईल. दिल्ली येथील ‘राइट्स’ एजन्सीचे अधिकारी विमानतळावर तळ ठोकून आहेत.
राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व सामान्य प्रशासन विभागाच्या पुढाकाराने बेलोरा विमानतळाचे संरचना व नियोजनसंदर्भात एजन्सी नेमण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली. त्यानुसार दिल्ली येथील राइट्स नामक एजन्सीकडे जबाबदारी सोपविली. तांत्रिक निविदेअंती राइट्ससोबत करारनामा करण्यात आला असून, तीन महिन्यांत विमानतळाचे विविध कामे पूर्ण करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानुसार राइट्स कंपनीची चमू दोन दिवसांपासून विमानतळावर दाखल झाली आहे. रन-वे, मातीपरीक्षणसह अन्य कामांबाबत सर्वेक्षण केले जात आहे. शासन विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिंगसंदर्भात राइट्सवर सव्वा दोन कोटी रूपये खर्च करणार आहे. २६ सप्टेंबरला राइट्सचे चार अधिकारी बेलोरा विमानतळावर डेरेदाखल झाले. ही चमू विमानतळाचे टोपो ग्रॉफिकल, भौगोलिक सर्व्हे, धावपट्टीचे निरिक्षण, एटीएस टॉवरची पाहणी केली. नाईट लँडिंग, रन-वे लांबीसंदर्भात नियोजन करतील.
विमान कंपन्यांकडून
प्रवाशांची चाचपणी
पुणे, मुंबई, हैद्राबाद, दिल्ली अशा महत्त्वाच्या शहरांसाठी अमरावती येथून विमानसेवा सुरू करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्याअनुषंगाने काही खासगी विमान कंपन्यांनी शासनाकडे प्रस्ताव एअर बस चालविण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. अमरावती येथून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने भविष्यात बेलारा विमानतळाहून या शहरांसाठी एअर बस सुरू होईल, असे संकेत आहे. मात्र, विमानतळाचे विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी निधीची मोठी कमतरता भासणार, असे चित्र आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी १५ कोटी मंजूर केले, उर्वरित ६० कोटींची प्रतीक्षा आहे.
डिसेंबरपासून दुसºया टप्प्यातील कामांना प्रारंभ
दिल्ली येथील राइट्स एजन्सीच्या चमूने बेलोरा विमानतळ निरीक्षणास सुरुवात केली. तज्ज्ञांचा या चमूत समावेश आहे. संरचना व नियोजनाची कामे सुरु झाली आहेत. मात्र, बेलोरा विमानतळाची दुसºया टप्प्यातील विकासकामे डिसेंबरपासून सुरू होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शासनाने बेलोरा विमानतळाची संरचना, नियोजनाची जबाबदारी ‘राइट्स’कडे सोपविली आहे. त्याअनुषंगाने दिल्ली येथील या एजन्सीची चमू विमानतळावर आली आहे. माती परीक्षणाचे काम सुरू झाले आहे.
- एम.पी. पाठक
प्रबंधक, बेलोरा विमानतळ