तिवस्यात नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करा
By Admin | Updated: March 5, 2017 00:09 IST2017-03-05T00:09:21+5:302017-03-05T00:09:21+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दिवसांच्या आत नाफेडच्यावतीने तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, ...

तिवस्यात नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करा
यशोमती ठाकूर : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, दोन दिवसांचा अल्टिमेटम्
तिवसा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दिवसांच्या आत नाफेडच्यावतीने तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अन्यथा तीव्र जनांदोलन छेडण्याचा इशारा शनिवारी यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
शेतकरी बाजार समितीत तूर व हरभरा खरेदीकरित नाफेडच्या वतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी यापूर्वीही केली असताना शासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप आ. यशोमती ठाकूर यांनी केला. नाफेडमध्ये व्यापारीच आपला फायदा करून घेत असून यामध्ये त्यांचे साटेलोटे असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांची अशी बिकट अवस्था असल्याने शेतकरी त्या भावाने अमरावती येथे किंवा खासगी व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री करीत आहेत. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आधीच शेतकरी सर्वच बाजूने संकटात असताना जे शेतात पीक राब-राब राबून पिकविले, त्या मालाचीसुद्धा अशी लूट होत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार, असा बनाव असणारे शासनकर्ते आता गप्प का, असा सवाल उपस्थित करून हे थापा मारून सत्तेत आलेले सरकार केवळ श्रीमंत व्यापाऱ्यांच्या हितासाठीच काम करीत असल्याचा आरोप आ. यशोमती ठाकूर यांनी केला. निवेदन देताना तिवसा बाजार समितीचे सभापती रामदास तांबेकर, जि.प. सदस्य जयंतराव देशमुख, अभिजित बोके, दापोरी ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र राऊत आदी उपस्थित होते.
हे सरकार व्यापाऱ्यांच्या हिताचे धोरण राबवीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड लूट होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू.
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा