आगीपासून बचाव करण्यासाठी जंगलात जाळरेषेच्या कामांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST2021-01-13T04:32:20+5:302021-01-13T04:32:20+5:30
अमोल कोहळे - पोहरा बंदी : उन्हाळ्यातील संभाव्य वणवा नियंत्रणासाठी वडाळी आणि चांदूर रेल्वे या दोन्ही वनपरिक्षेत्रांतील वडाळी, पोहरा, ...

आगीपासून बचाव करण्यासाठी जंगलात जाळरेषेच्या कामांना प्रारंभ
अमोल कोहळे - पोहरा बंदी : उन्हाळ्यातील संभाव्य वणवा नियंत्रणासाठी वडाळी आणि चांदूर रेल्वे या दोन्ही वनपरिक्षेत्रांतील वडाळी, पोहरा, चिरोडी, चांदूर रेल्वे व माळेगाव या पाचही वर्तुळांच्या बीटनिहाय जाळरेषेच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
उन्हाळ्यात जंगलाचे आगीपासून बचाव करण्यासाठी फायर लाईन तयार करणे ही नियमावली असल्याने वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी आपापल्या अधिनस्थ वनपाल, वनरक्षक, वनमजूर, संरक्षण मजूर यांना एका पत्राद्वारे आग नियंत्रणासाठी जाळरेषेची जबाबदारी निश्चित केली आहे. या दोन्ही वनपरिक्षेत्रांत जंगलाच्या सीमेपासून आतील व बाहेरील रस्त्या दुतर्फा सहा-सहा मीटरचे अंतर ठेवून जाळरेषेचे काम करण्यास वनपाल, वनरक्षक, वनमजूर, संरक्षण मजूर यांनी सपाटा चालविला आहे.
उन्हाळ्यात जंगलांना सतत आगी लागण्याच्या मोठमोठ्या घटना घडतात. लागणाऱ्या आगीत हजारो हेक्टर वनसंपत्तीचे नुकसान होते. यामुळे वणव्यापासून जंगलाचे संरक्षण करण्याकरिता दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वडाळी आणि चांदूर रेल्वे वनविभागाने जाळरेषा तयार करण्यासाठी पावले उचलली आहेत. १५ फेब्रुवारीपूर्वी जाळरेषा काढणे सुरू झाले आहे.
बॉक्स
अशी काढली जाते जाळरेषा
बीटनिहाय जंगलाच्या सीमेपासून रस्त्याच्या कडेपर्यंत लांबी व रुंदी मोजणी करण्यात येते. वडाळी आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील येणाऱ्या वर्तुळांमध्ये वनरक्षक, वनमजूर, संरक्षण मजूर यांनी आपापल्या बीटमध्ये नियमावलीनुसार जाळरेषेचे सर्वप्रथम काम जंगलाच्या सीमेपासून आतील व बाहेरील रस्त्याच्या कडेपर्यंत सहा मीटर रुंदी व नियतक्षेत्राच्या सिमेपर्यंत लांबी कटर मशीनद्वारे पट्ट्यावरील कटाई करुन तो पट्टा जाळला जातो. ही जाळरेषा काढल्यानंतर आखणीनुसार एक काळाशार पट्टा तयार होतो.