अमरावतीत आयईटीईच्या राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:21 IST2018-09-29T22:21:03+5:302018-09-29T22:21:34+5:30

आयईटीईच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे शनिवारी थाटात पार पडले. दोन दिवस चालणाऱ्या या ६१ व्या राष्ट्रीय परिषदेला भारताच्या चांद्रयान मोहिमेत सहभागी तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.

Start of IETE National Council in Amravati | अमरावतीत आयईटीईच्या राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

अमरावतीत आयईटीईच्या राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

ठळक मुद्देहंसराज अहीर उपस्थित : मेघे अभियांत्रिकीत शास्त्रज्ञांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : आयईटीईच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे शनिवारी थाटात पार पडले. दोन दिवस चालणाऱ्या या ६१ व्या राष्ट्रीय परिषदेला भारताच्या चांद्रयान मोहिमेत सहभागी तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.
उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री प्रवीण पोटे, आयईटीईचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के.टी.व्ही. रेड्डी, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, उपाध्यक्ष हेमंत देशमुख, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारी सदस्य नितीन हिवसे, उदय देशमुख, गजानन काळे, रागिनी देशमुख, आयईटीई अमरावतीचे अध्यक्ष प्रशांत इंगोले, अमोल बोडखे, प्राचार्य एम.एस. अली उपस्थित होते.
आविष्कार व संशोधन आपल्या देशाची परंपरा असल्याचे सांगत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आयईटीई तसेच विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे कौतुक केले. विदेशातही पाऊल ठेवलेल्या आयईटीईने अमरावतीला राष्ट्रीय परिषदेचा मान देऊन या शहराची अभियांत्रिकी क्षेत्रात ओळख प्रस्थापित केल्याचे ते म्हणाले. ‘विद्यार्थी देश की ताकत है, इन्हे और मजबूत बनाने की जरूरत है’ असे सूचक उद्गार त्यांनी काढले. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी ना. अहीर यांचे आभार मानले. उपस्थित सर्व सन्माननीय शास्त्रज्ञांचे स्वागत केले. डॉ. एम.एन. हुडा यांनी तांत्रिक बाबी, उद्याचे तंत्रज्ञान व महाविद्यालय यांच्यातील दरी दूर करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी पद्मश्री लेफ्टनंट कर्नल दिवाकर सेन यांनी शास्त्रज्ञांचा परिचय दिला. अध्यक्षीय भाषणात डॉ. रेड्डी यांनी उपस्थित संशोधकांचे अभिनंदन केले. संचालन निकू खालसा व मैथिली देशमुख यांनी केले. प्रास्ताविकात प्रशांत इंगोले यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व आयईटीईची कार्यकक्षा स्पष्ट केली.
चांद्रयान-२ चे उपसंचालक डॉ. चंद्रकांता कुमार, डॉ. इस्रोचे संचालक सिवन, ट्रायचे माजी अध्यक्ष टी.एस. चौधरी, पद्मश्री डॉ. टी. हनुमान चौधरी, फ्री टू एअर संकल्पनेचे जनक आर. के. गुप्ता, डीआरडीओचे के. लक्ष्मीनारायण, अमेरिकेच्या हॅडली विद्यापीठाचे डॉ. प्रसाद शास्त्री व वेल लॅबचे माजी संचालक डॉ. एम.एच. कोरी, डॉ. कासट, डॉ. अजय ठाकरे, प्रा. संजय धोपटे, डॉ. एच.आर. देशमुख व आयईटीईचे पदाधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यांना केले पुरस्कृत
डीआरडीओमध्ये ३७ वर्षे प्रकल्प संचालक म्हणून सेवा देणारे के. लक्ष्मीनारायण तसेच टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात ४० वर्षे सेवा देणारे डॉ. एन.एच. कोरी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी दिल्ली आयईटीई सेंटरला उत्कृष्ट सेंटरचा पुरस्कार देण्यात आला. द्वितीय क्रमांक पुरस्कार बंगळुरू सेंटरने पटकावला. उपकेंद्राचा पुरस्कार यवतमाळला देण्यात आला.
आज-उद्या शोधनिबंध सादरीकरण
राष्ट्रीय परिषदेत ९० संशोधक व १२० अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे शोधनिबंधांचे सादरीकरण होत आहे. याशिवाय १२० शाळकरी मुलांच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ३० सप्टेंबर रोजी मेघे अभियांत्रिकीच्या आवारात होत आहे. या प्रदर्शनाचे अवलोकन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Start of IETE National Council in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.