दर्यापुरात अवकाळीचा मारा सुरूच
By Admin | Updated: March 13, 2015 00:17 IST2015-03-13T00:17:15+5:302015-03-13T00:17:15+5:30
तालुक्यावर अवकाळी पावसाची वक्रदृष्टी कायम असून बुधवारनंतर गुरूवारीदेखील तालुक्याला पावसाने झोडपूून काढले.

दर्यापुरात अवकाळीचा मारा सुरूच
किरण होले दर्यापूर
तालुक्यावर अवकाळी पावसाची वक्रदृष्टी कायम असून बुधवारनंतर गुरूवारीदेखील तालुक्याला पावसाने झोडपूून काढले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने जगावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.
शेतकऱ्यांनी हरभरा कापून त्याचे ढीग शेतात रचून ठेवले होते. मात्र, बुधवारी पहाटे आणि गुरूवारी बरसलेल्या अवकाळी पावसाने हे पीक भिजले. त्यामुळे हरभरा काळा पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे. यापूर्वीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची इतर पिके हातची गेली. त्यामुळे त्यांची सगळी भिस्त आता हरभऱ्यावरच होती. परंतु अवकाळी पावसाने हरभऱ्याचीदेखील पूरती वाट लावली आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांचे २० ते २५ पोत्यांचे नुकसान झाले. शासनाकडून पुरेशी आर्थिक मदत मिळेलच याची काही शाश्वती नसल्याने पेरणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी गुरफटला आहे.
खरिपाचे पीक हातचे गेल्यानंतर सारी मदार रबी पिकावर होती. परंतु अवकाळी पावसाने रबीवरही कुठाराघात केला. हरभरा कापणीवर आला असताना अचानक पाऊस बरसल्याने सवंगणीत अडचणी निर्माण झाल्या. जेमतेम सवंगणी करून ठेवलेला हरभरा शेतात गंजी लावून ठेवला. त्यावर दोन दिवस पाऊस बरसल्याने काढणीला उसंत मिळू शकली नाही. त्यामुळे गंजीतला हरभरा पाण्यात ओला झाल्याने काळा पडण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. पुन्हा शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची पार दैना झाली आहे. शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली जात आहे.