शेतकऱ्यांसाठी पशु चारा छावणी सुरू
By Admin | Updated: May 9, 2015 00:31 IST2015-05-09T00:31:36+5:302015-05-09T00:31:36+5:30
सध्याचा उन्हाळा अतिशय कडक तापत असल्याने शेतकऱ्यांना व पशुपालकांना पशुधन सांभाळणे अशक्य झाले आहे.

शेतकऱ्यांसाठी पशु चारा छावणी सुरू
उपक्रम : पशुधन बचाओ समिती, जय जिनेंद्र ग्रुपचा पुढाकार
अमरावती : सध्याचा उन्हाळा अतिशय कडक तापत असल्याने शेतकऱ्यांना व पशुपालकांना पशुधन सांभाळणे अशक्य झाले आहे. पशुधनाच्या चारा-पाण्याची समस्या गंभीर होत असल्याने यावर उपाय म्हणून पशुधन बचाओ समिती व जय जिनेंद्र ग्रुपद्वारे नजीकच्या वडगाव माहोेरे येथे पशुचारा छावणी सुरू करण्यात आली आहे.
राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला. यामुळे पशुंच्या विक्रीवर निर्बंध आले. दुष्काळामुळे पाळीव पशुंना जगविण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. पशुंच्या देखभालीकरिता चारा छावणीचा उपक्रम सुरू करण्यात आला. वडगाव माहोरे येथे सुनील सरोदे यांच्या शेतात छावणी उभारण्यात आली आहे. यावेळी पशुधन बचाओ समितीचे राजेंद्र पांडे, किशोर देशुंख, मनोज गोयनका, रश्मी नावंदर, संदीप वैद्य, हरिओम अग्रवाल, बंडू माहोरे, जय जिनेंद्र ग्रुपचे सुज्योत नागपुरे, राजेंद्र बन्नोरे, अभिजित फुलंबरकर, सचिन जैन, अंकित चुंबळे, निरंजन फुकटे, सजल जैन आदींची उपस्थिती होती.
अशी आहे प्रक्रिया
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची जनावरे या पशुचारा छावणीत पाठवावयाची असल्यास त्यांच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील यांच्या दाखल्यासह तसेच आधार कार्डच्या झेरॉक्ससह पशुधन बचाओ समितीकडे अर्ज करावा. शेतकरी स्वानंद आयुर्वेद, शेगाव नाका येथे किशोर देशमुख, महेश देवळे, सुनील सरोदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी त्यांची जनावरे १५ जुलैपर्यंत या चारा छावणीत ठेवू शकतील. यानंतर त्यांना त्यांची जनावरे स्वखर्चाने परत न्यावी लागतील.