स्टार प्रचारकांची वानवा

By Admin | Updated: October 9, 2014 22:55 IST2014-10-09T22:55:28+5:302014-10-09T22:55:28+5:30

राज्यात एकाच वेळी १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. प्रचाराचा ज्वर चढत असताना भाजप, सेना वगळता इतर पक्षांकडे स्टार प्रचारकांची वानवा जाणवते आहे.

Star campaigners | स्टार प्रचारकांची वानवा

स्टार प्रचारकांची वानवा

अमरावती : राज्यात एकाच वेळी १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. प्रचाराचा ज्वर चढत असताना भाजप, सेना वगळता इतर पक्षांकडे स्टार प्रचारकांची वानवा जाणवते आहे. स्टार प्रचारकांचे दौरे, आणि प्रचारसभा अत्यल्प प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे भाजप, सेनेचे नेते मात्र त्यांच्या उमेदवारांसाठी जीवाचे रान करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात अजित पवार, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, विनोद तावडे हे येऊन गेलेत.
काही निवडणुकांचा आलेख तपासला तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांनी फार गर्दी केली नाही. जिल्ह्यात सर्वच पक्षांचे नेते आपापल्या बळावर प्रचाराची धुरा सांभाळत असल्याचे दिसून येते. बड्या स्टार प्रचारकांची उमेदवार मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. स्टार प्रचारक आल्याशिवाय निवडणुकीला पोषक वातावरण तयार होत नाही. त्यामुळे अनेक उमेदवार पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधून आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेनेचे राज्यस्तरीय नेते आपआपल्या मतदारसंघात गुंतल्याने मतदार संघाबाहेर पडणे त्यांना कठीण झाले आहे. आघाडी, युती संपुष्टात आल्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा प्रचारादरम्यान कस लागत आहे.
येत्या बुधवारी विधानसभा निवडणूक असून उमेदवार ५० टक्के मतदारांपर्यत पोहोचू शकले नाहीत, हे वास्तव आहे. ज्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची फळी तयार आहे, त्याच पक्षाच्या उमेदवारांचे चिन्ह आणि नाव मतदारांपर्यंत पोहोचले आहे. गाव, खेड्यात अद्यापही एक, दोन उमेदवार वगळता मैदानात असलेल्या उमेदवारांची नावेसुद्धा माहीत नाहीत. भाजप, सेनेच्या नेत्यांनी प्रचारात आघाडी घेण्यासाठी स्टार प्रचारकांना सभा, रोड शो, कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारांपुढे आणण्याची शक्कल लढविली आहे. मनसेचे राज ठाकरे हेसुद्धा जाहीर सभांच्या माध्यमातून मनसे उमेदवारांसाठी वातावरण निर्माण करीत आहेत. मात्र, जिल्ह्यातील मनसे उमेदवारांकरिता राज ठाकरे कितपत तारणहार सिध्द होऊ शकतात, हे लवकरच दिसून येईल. १३ आॅक्टोबरच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचाराची रणधुमाळी चालणार आहे. त्याअनुषंगाने पुढील ६ दिवस जिल्ह्यात स्टार प्रचारकांचा ठिय्या राहील, अशी तयारी सर्वच पक्षांनी चालविली आहे.
काँग्रेसने राहुल गांधी, अशोक चव्हाण, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, मोहनप्रकाश, माणिकराव ठाकरे, मुकुल वासनिक आदी नेत्यांना जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारात उतरविण्याची रणनीती आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार, प्रफुल्ल पटेल, आर.आर. पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड, जयंत पाटील आदी नेत्यांच्या प्रचारसभांचे नियोजन आखल्याची माहिती आहे.
भाजपने नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, रामदास आठवले या नेत्यांना उमेदवारांच्या प्रचारार्थ आणण्याची जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेने आदेश बांदेकर, आदित्य ठाकरे, रामदास कदम, मनोहर जोशी, दिवाकर रावते, संभाजी भोसले या स्टार प्रचारकांच्या सभा आयोजित करण्याचे ठरविले आहे. निवडणुकीला उणेपुरे आठ दिवस असताना प्रचारात जोश आलेला दिसत नाही.
उमेदवार आपआपल्या पद्धतीने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. येत्या काही दिवसांत स्टार प्रचारकांच्या गर्दीमुळे थोडेफार चित्र पालटणार, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Web Title: Star campaigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.