आज ठरणार स्थायीचे सभापती
By Admin | Updated: March 17, 2017 00:07 IST2017-03-17T00:07:21+5:302017-03-17T00:07:21+5:30
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी शुक्रवार १७ मार्चला निवडणूक प्रक्रिया होत आहे.

आज ठरणार स्थायीचे सभापती
भारतीयकडे जबाबदारी : भाजपकडे ९ चे संख्याबळ
अमरावती : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी शुक्रवार १७ मार्चला निवडणूक प्रक्रिया होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता ही निवडणूक होईल. ४५ सदस्यीय भाजपने यापूर्वीच स्थायी समितीचे सभापती म्हणून तुषार भारतीय यांचे नाव घोषित केल्याने शुक्रवारी केवळ औपचारिकता पार पडेल.
मनपाच्या १६ सदस्यीय स्थायी समिती सभागृहात भाजपच्या गटाचे ९ सदस्य असल्याने तुषार पंडितराव भारतीय यांची निवड होणे निश्चित आहे. युवा स्वाभिमान पक्षाच्या तीन सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपने स्वाभिमानच्या सपना ठाकूर यांना स्थायी समिती सदस्य म्हणून पाठविले आहे. याखेरीज भाजपचे आठ सदस्य असल्याने सभापतीपदाच्या निवडीसाठी आवश्यक ९ चे संख्याबळ भाजपकडे आहे. त्यामुळे इतर कुणी निवडणूक रिंगणात नसल्यास तुषार भारतीय यांची स्थायी सभापती म्हणून निवड अविरोधही होऊ शकते.
शुक्रवारी सकाळी ९.३० ते १०.३० दरम्यान सभापतीपदासाठी नामांकन, नामांकन माघारही याच कालावधीत घेण्यात येईल. भारतीय यांचे एकमेव नामांकन आल्यास ही निवडणूक अविरोध होईल. स्थायीच्या १६ सदस्यांची घोषणा ९ मार्चच्या विशेष सभेत करण्यात आली होती. (प्रतिनिधी)