रेल्वे प्लॅटफॉर्मवरील स्टॉल्स ठरताहेत घातक
By Admin | Updated: February 1, 2016 00:06 IST2016-02-01T00:06:24+5:302016-02-01T00:06:24+5:30
येथील रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी अवैधरित्या लागणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स प्रवाशांसाठी धोक्याचे ठरत आहेत.

रेल्वे प्लॅटफॉर्मवरील स्टॉल्स ठरताहेत घातक
दुर्लक्ष : प्रवासी अडखळतात, रेल्वे प्रशासन उदासीन
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
येथील रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी अवैधरित्या लागणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स प्रवाशांसाठी धोक्याचे ठरत आहेत. याकडे रेल्वे पोलीस व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गर्दीत या स्टॉलला अडखळून अनेक प्रवासी पडत आहेत. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. या स्टॉल्समुळे एखादवेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बडनेरा हे रेल्वेचे जंक्शन आहे. येथून देशभरात प्रवासीगाड्या ये-जा करतात. हजारोंच्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन येथे अवैधरित्या खाद्यपदार्थ विक्रीला जोर आला आहे. चढ्या भावाने पदार्थ विकले जात आहेत. प्रवाशांची प्रचंड लूट सुरू असताना रेल्वे प्रशासन मात्र उदासिन असल्याचे दिसून येत आहे. अलिकडे रेल्वे प्लॅटफॉर्मवर ठिकठिकाणी जेवणाची पाकिटे विक्रेत्यांचे व अन्य खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले जातात. प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यावरच हे स्टॉल्स लावले जातात.
गाडी थांबल्यावर प्रवाशांची या स्टॉल्सवर एकच झुंबड उडते. स्टॉल्स प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी असल्याने बरेच प्रवासी अडखळून पडतात. रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासनाचे कुठलेही भय न बाळगता अवैध स्टॉलधारक राजरोसपणे खाद्य पदार्थ, इडली व जेवणाची पाकिटे विकत आहेत. अप्लॅटफॉर्मच्या मधोमध स्टॉल लाऊन खाद्यपदार्थ विक्रीची परवानगी या स्टॉलधारकांना नाही. प्रवाशांमध्ये याबादद्ल तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.