धारणीत डायरिया, मलेरियाचा प्रकोप
By Admin | Updated: September 11, 2014 23:12 IST2014-09-11T23:12:29+5:302014-09-11T23:12:29+5:30
शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने जलजन्य विषाणुंमुळे रोगराई उत्पन्न झाली असून ५० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे. बाह्यरूग्ण विभाग तसेच प्रयोगशाळेसमोर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.

धारणीत डायरिया, मलेरियाचा प्रकोप
श्यामकांत पाण्डेय - धारणी
शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने जलजन्य विषाणुंमुळे रोगराई उत्पन्न झाली असून ५० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे. बाह्यरूग्ण विभाग तसेच प्रयोगशाळेसमोर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.
धारणी येथील उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात १५० ते २०० रूग्णांची ओपीडीमध्ये नोंद होत असून सामान्य रूग्णांना उपचार करून सुटी दिली जात असली तरी रोज तापाने व डायरियाने ग्रस्त रूग्ण उपचारार्थ या रूग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे रूग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या आहेत. परिणामी एका पलंगावर दोन रूग्णांना झोपवावे लागत आहे.
धारणीत २००३ मध्ये ५० खाटांच्या भव्य अत्याधुनिक सर्व सोयींनी युक्त उपजिल्हा रूग्णालयाचे उदघाटन गेल्या १२ जून रोजी पार पडले होते. या रूग्णालयात आॅपरेशन थिएटर, क्ष-किरण यंत्रणा, सोनोग्राफी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या अभावी या रूग्णालयात उपचार करणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. काही डॉक्टरांच्या भरवशावर येथील आरोग्याचा डोलारा उभा असल्याचे दिसते. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, कुपनलिकांमधून अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जात आहे. हेच गढूळ पाणी शुध्द न करता लोकांच्या घरात पोहोचत आहे. या पाण्यात निर्जंतुकीकरणासाठी कोणत्याही प्रकारचे पावडर अथवा द्रव्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे परिसरातील जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम दिसू लागला आहे. दूषित पाण्यामुळे मलेरिया, डायरिया सारखे आजार तोंड वर काढू लागले आहेत. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास कावीळची साथ पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.