अचलपूर बाजार समितीचा कर्मचारीच माफीचा साक्षीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:25+5:302021-04-05T04:12:25+5:30
नोकरी भरती प्रकरण, संचालकांची धावाधावही चर्चेत परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील पद भरती प्रकरणात आरोपी असलेला बाजार ...

अचलपूर बाजार समितीचा कर्मचारीच माफीचा साक्षीदार
नोकरी भरती प्रकरण, संचालकांची धावाधावही चर्चेत
परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील पद भरती प्रकरणात आरोपी असलेला बाजार समितीचा एक कर्मचारी पोलीस दफ्तरी माफीचा साक्षीदार बनण्यास तयार झाला आहे. पोलिसांनी त्याला माफीचा साक्षीदार बनविण्याची तयारी चालवली आहे.
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सन २०१९ मध्ये नोकर भरती केली गेली. यातील शिपाई पदाकरिता लता वाजपेयी यांनी ३० जुलै २०१९ ला ऑनलाईन फॉर्म भरला. पण, त्यासोबत त्याच दिवशी ऑनलाईन परीक्षा शुल्क भरले नाही. तरीपण हा ऑनलाईन फॉर्म स्वीकारला गेला आणि तीनशे रुपये शुल्क २ ऑगस्ट २०१९ ला भरले. अंतिम दिनांक संपल्यानंतर हे शुल्क उमेदवार लता वाजपेयींचा चुलतभाऊ शैलेश शुक्ला यांच्या एटीएम कार्डच्या माध्यमातून भरले गेले. शैलेश शुक्ला बाजार समितीतच शिपाई पदावर कार्यरत असून, नोकर भरतीत लता वाजपेयी यांचीच निवड होऊन नियुक्ती झाली. यावरून ही नोकर भरतीच चर्चेत आली. हे बघता शैलेश शुक्ला याने ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेतली. ते शुल्क मी भरले नाही. माझ्या एटीएम कार्डवरून सहायक सचिव मंगेश भेटाळू यांनी भरल्याची भूमिका त्याने घेतली. नंतर एका प्रतिज्ञापत्राद्वारे परत शुक्लाने आपली भूमिका बदलली.
दरम्यान या भरती प्रक्रियेबाबत सहकार प्रशासनासह पोलिसांकडे तक्रार दिली गेली. अचलपूर पोलिसांनी आपला चौकशी अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला. एसपींनी तो जिल्हा उपनिबंकाकडे पाठवून कायदेशीर कारवाई करण्यास सुचविले. जिल्हा उपनिबंधकांच्या पत्रावरून बाजार समितीचे सभापती व सचिवांनी परतवाडा पोलिसांकडे तक्रार दिली. परतवाडा पोलिसांनी या शैलेश शुक्लांसह, लता वाजपेयी व मंगेश भेटाळू यांचेविरुद्ध गुन्हा दाखल केला. अचलपूर पोलिसांनी पुढे तपासात के.एन.के. कपंनीशी संबंधितांवर गुन्हे दाखल केले. काही संचालकांचे बयाणही अचलपूर पोलिसांनी नोंदविले. गुन्हा दाखल असलेल्या पाचही जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान जिल्हा उपनिबंधकांचेही बयाण अचलपूर पोेलिसांनी नोंदविले. पोलिसांच्या प्रश्नावलीची उत्तरेही जिल्हा उपनिबंधकांनी लिखित स्वरुपात अचलपूर पोलिसांकडे सादर केली आहेत. या सर्व घडामोडीतील गुन्हा दाखल असलेला आरोपी शैलेश शुक्ला आता अचलपूर पोलिसांकडे माफीचा साक्षीदार बनणार आहे. त्यामुळे प्रकरण नव्याने चर्चेत आले आहे.
बाजार समितीच्या संचालकांची अटकपूर्व जामिनाकरिता धावपळ
अचलपूर बाजार समितीच्या नोकर भरती प्रकरणात संचालकांनी तात्पुरता व नियमित अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून धावपळ सुरू केली आहे. यात चार संचालकांचे अर्ज वकिलांनी नोटरी करून तयार केले आहेत. हे अर्ज अचलपूर न्यायालयात सोमवारी दाखल केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नितीन चौधरी यांनी हे जामीन अर्ज तयार केले आहेत. दादा टाले यांचेकडे ते अर्ज नोटरी केल्या गेले. यात संचालक राजेंद्र गोरले, गंगाधरराव चौधरी, राजाभाऊ टवलारकर व गंगाराम काळे यांचा समावेश आहे.
या संचालकांचे मोबाईल फोन बंद येत आहेत. ते नॉट रिचेबल आहेत. दरम्यान वृत्त लिहिस्तोवर संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत किंवा दाखल गुन्ह्यात त्यांची नावे जोडल्या गेलेली नाहीत. अचलपूर बाजार समितीवर १७ संचालक कार्यरत आहेत. उर्वरित संचालकही अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या तयारीला लागल्याची सूत्रांची माहिती आहे.