एसटी सेवा सुरू, पगार मात्र नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:00 AM2020-09-20T05:00:00+5:302020-09-20T05:00:37+5:30

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे एसटी सेवाही बंद झाली. लॉकडाऊन शिथिल होताच जिल्ह्यात प्रवासी घेऊन बस धावू लागल्या. यासोबतच मालवाहतुकीसाठी एसटीचा उपयोग होऊ लागला. कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वत्र पसरत असताना, जिवाची पर्वा न करता चालक-वाहकांसह अन्य कर्मचारी सेवा बजावत आहेत.

ST service started, but no salary! | एसटी सेवा सुरू, पगार मात्र नाही!

एसटी सेवा सुरू, पगार मात्र नाही!

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांपुढे घरखर्चाचा प्रश्न । कोरोनाने आर्थिक मुद्यावर केले हैराण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाला. वेतन रखडल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या त्यांच्यापुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा, हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे एसटी सेवाही बंद झाली. लॉकडाऊन शिथिल होताच जिल्ह्यात प्रवासी घेऊन बस धावू लागल्या. यासोबतच मालवाहतुकीसाठी एसटीचा उपयोग होऊ लागला. कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वत्र पसरत असताना, जिवाची पर्वा न करता चालक-वाहकांसह अन्य कर्मचारी सेवा बजावत आहेत. मात्र, त्यांचे कोरोनाकाळात बसफेऱ्या बंद असल्याच्या काळातील दोन ते तीन महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा, असा प्रश्न भेडसावत आहे. अगोदरच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी, तेही वेळेत मिळत नाही. इतर विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत दिले जाते. मग एसटी कर्मचाऱ्यांवरच अन्याय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीत बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. पण, वेतन झाले नाही. वेतन नसल्याने या कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक स्थिती खालावली आहे. शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा रोष कर्मचाऱ्यांमध्ये आहे. उसनवारीने दिलेल्या पैशांची परतफेड होणार नाही, असे गृहीत धरून एसटी कर्मचाऱ्यांना बँक किंवा सोसायटीच नव्हे, आप्तदेखील काही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. कर्मचाऱ्यांनी मेडिकल बिल भरले तरी पैसे मिळत नसल्याची माहिती आहे.

अनेक अडचणीचा सामना
दोन ते तीन महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे वीज देयके भरण्यासाठी पैसे नाहीत. कुटुंबातील व्यक्ती आजारी पडली, तर दवाखान्यात नेण्याची परिस्थिती नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, हा खरा प्रश्न असून, पैसे नसल्याने एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता, रखडलेले वेतन तातडीने द्यावे, असे एसटी कामगार सेनेचे विभागीय कार्याध्यक्ष एस.आर. शर्मा म्हणाले.

रखडलेले वेतन देण्यासाठी अनेकदा संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला. परंतु, केवळ आश्वासन मिळाले. रखडलेले वेतन त्वरित देण्यात यावे.
- जयसिंह चव्हाण
आगार अध्यक्ष, एसटी कामगार संघटना

कारोना काळातही जीव धोक्यात टाकून कामे करीत आहोत. मागील तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने उपासमारच होत आहे. मुलांच्या शिक्षणासोबत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले. कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तातडीने वेतन द्यावे.
- शीतल मोहोड,
निर्भया प्रमुख, एसटी कामगार संघटना

Web Title: ST service started, but no salary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.