एसटी फेऱ्या वाढणार: आठवडाभरात १५०० संपकरी कामावर परतले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST2022-04-20T05:00:00+5:302022-04-20T05:00:56+5:30
एसटीच्या अमरावती विभागातील अनेक कर्मचारी गत पाच महिन्यांपासून संपावर होते. त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित झाली होती. आता हळूहळू कर्मचारी कामावर परत येत आहेत. जिल्ह्यातील एकूण ८ आगारामधील एकंदरीत ३७७ बसगाड्यांपैकी २१५ बस आता रस्त्यावर धावू लागल्या आहेत. सर्वच प्रमुख शहरांसाठी बसगाड्या उपलब्ध झाल्या आहेत तथापी अजूनही ग्रामीण भागात लालपरी धावत नसल्याने गावकऱ्यांची अडचण कायम आहे.

एसटी फेऱ्या वाढणार: आठवडाभरात १५०० संपकरी कामावर परतले !
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप आता संपुष्टात येत आहे. उच्च न्यायालयाने येत्या २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये आतापर्यंत १ हजार ६०० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत; परिणामी लालपरी पूर्वपदावर येत आहे.
एसटीच्या अमरावती विभागातील अनेक कर्मचारी गत पाच महिन्यांपासून संपावर होते. त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित झाली होती. आता हळूहळू कर्मचारी कामावर परत येत आहेत.
जिल्ह्यातील एकूण ८ आगारामधील एकंदरीत ३७७ बसगाड्यांपैकी २१५ बस आता रस्त्यावर धावू लागल्या आहेत. सर्वच प्रमुख शहरांसाठी बसगाड्या उपलब्ध झाल्या आहेत तथापी अजूनही ग्रामीण भागात लालपरी धावत नसल्याने गावकऱ्यांची अडचण कायम आहे.
४०० चालक ५०० वाहक परतले
जिल्ह्यातील ८ आगारातील संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ४०० चालक,५०० वाहक आणि ७०० यांत्रिकी व प्रशासकीय कर्मचारी कामावर परतले आहे.
अजूनही बरेच कर्मचारी कामावर रुजू झालेले नसले तरी २२ एप्रिलपर्यंत बहुतांश कर्मचारी कर्तव्यावर परतण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळाच्या सर्व बस फेऱ्या सुरू होऊन येत्या आठवडाभरात लालपरी पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत.
२२ एप्रिलची डेडलाईन
- संपकरी कर्मचाऱ्यांना २२ पर्यंत कामावर हजार व्हावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. परत येणाऱ्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशात नमूद आहे.
- बडतर्फ कर्मचाऱ्यांना अपील सादर करून सुनावणी झाल्यानंतर कामावर रुजू करून घेण्यात येत आहे.
- २२ नंतरही रुजू न होणाऱ्यांचा विचार केला जाणार नाही.
एसटीच्या फेऱ्या वाढणार
- संपातील कर्मचारी हळूहळू कामावर परत येत असल्यामुळे सर्व आगारातील अनेक बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत.
- उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर एसटीच्या फेऱ्या वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.