एसटी बस होणार ६७ वर्षांची!

By Admin | Updated: May 31, 2015 00:15 IST2015-05-31T00:15:45+5:302015-05-31T00:15:45+5:30

सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला येत्या ...

ST bus will be 67 years old! | एसटी बस होणार ६७ वर्षांची!

एसटी बस होणार ६७ वर्षांची!

१ जूनला परिवर्तन दिन : एसटी आगारात विविध कार्यक्रम
अमरावती : सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला येत्या सोमवारी म्हणजेच १ जून रोजी ६७ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या परिवहन दिनानिमित्त एसटी महामंडळाने जिल्ह्यासह राज्यभरातील सर्वच आगारांमध्ये विविध उपक्रम जाहीर केले आहेत. या उपक्रमांमध्ये प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. त्यासोबतच उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी प्रत्येक प्रवाशाचे फूल देऊन स्वागत करण्यात येईल.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही महिन्यातच नगर ते पुणे या मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी धावली होती. तेव्हापासून हा दिवस एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, मागील वर्षीपासून हा दिवस परिवहन दिन म्हणून साजरा करण्याची पद्धत राज्य परिवहन महामंडळाने सुरू केली आहे. या दिवशी एसटीचे कर्मचारी आणि प्रवाशी यांना केंद्रस्थानी ठेवण्यात येऊन अनेक कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व एसटी आगारामध्ये विविध कार्यक्रम दिवसभर साजरे केले जाणार आहेत.
परिवहन दिनाचे औचित्य साधून एसटीच्या ताफ्यातील सर्व बसगाड्या आतून व बाहेरून स्वच्छ करण्यात येणार आहेत. यामागे प्रवाशांना एसटीचा प्रवास आल्हाददायक वाटावा, हा उद्देश आहे. त्याशिवाय एसटीची सर्व बसस्थानके स्वच्छ आणि सुशोभित केली जातील. या दिवशी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचे स्वागत पुष्प देऊन केले जाणार आहे. एसटीच्या सर्व आगारात उत्तम कामगिरी करणारे वाहक-चालक, यांत्रिक विभागातील कर्मचारी यांचाही गौरव प्रत्येक आगारात करण्यात येईल. विशेष म्हणजे या दिवशी एसटीचे अधिकारी प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतील. (प्रतिनिधी)

Web Title: ST bus will be 67 years old!