श्रीनिवास रेड्डी यांना ३० एप्रिलपर्यंत महिला आयोगाकडून ‘डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST2021-04-10T04:13:01+5:302021-04-10T04:13:01+5:30

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, वकिलांमार्फत अथवा स्वत: जबाब दाखल करावा लागेल अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी ...

Srinivas Reddy has been given a deadline of April 30 by the Women's Commission | श्रीनिवास रेड्डी यांना ३० एप्रिलपर्यंत महिला आयोगाकडून ‘डेडलाईन

श्रीनिवास रेड्डी यांना ३० एप्रिलपर्यंत महिला आयोगाकडून ‘डेडलाईन

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, वकिलांमार्फत अथवा स्वत: जबाब दाखल करावा लागेल

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने व्यक्तिश: निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, रेड्डी यांनी महिला आयोगाकडे दाद मागितली असून, आता ३० एप्रिलपर्यंत वकिलामार्फत अथवा स्वत: रेड्डी यांना जबाब दाखल करावा लागणार आहे.

दीपाली आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागाचे निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला पोलिसांनी अटक केली. दीपाली यांच्या सुसाईड नोटच्या आधारे वनखात्याने अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांचे निलंबन केले. मात्र, राज्य महिला आयोगाकडे प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने एम.एस.रेड्डी यांना २९ मार्च रोजी नोटीस बजावून आठ दिवसांत म्हणणे मांडण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील यांनी दिले होते. परंतु, नोटीस प्राप्त होताच रेड्डी यांनी महिला आयोगाकडे जबाब सादर करण्यासाठी काही दिवसांचा अवधी मागतिला. सध्या वनखात्याने निलंबन केले असून, चौकशी सुरू असल्याचे रेड्डी यांनी महिला आयोगाला सांगितले. मात्र, दीपाली आत्महत्याप्रकरणी जे काही जबाब सादर करायचे असेल ते वकिलामार्फत अथवा स्वत: येऊन महिला आयोगाकडे सादर करावे, त्याकरिता रेड्डी यांना ३० एप्रिलपर्यंत ‘डेडलाईन‘ देण्यात आली आहे.

-------------

कोट

रेड्डी यांनी जबाब सादर करण्यासाठी अवधी मागतिला आहे. वनखात्याने त्यांचे निलंबन केले असून, त्यांना मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश आहेत. त्यामुळे दीपाली आत्महत्याप्रकरणी रेड्डी यांना ३० एप्रिलपर्यंत म्हणणे मांडण्यासाठी अवधी दिला आहे.

- अनिता पाटील, सदस्य सचिव, राज्य महिला आयोग.

---------------

आरोपी विनोद शिवकुमारची बदली का नाही?

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा कार्यकाळ जुलै २०२० मध्ये संपुष्टात आला होता. मात्र, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याच्या आशीवार्दाने विनोद शिवकुमार याची बदली थांबवून ठेवली. व्याघ्र प्रकल्पात काही गैरकारभार करण्यासाठी विनोद शिवकुमारची रेड्डी यांना मदत हवी होती. त्यामुळेच कालावधी संपुष्टात येऊनही विनोद शिवकुमार गुगामल वन्यजीव विभागात उपवनसंरक्षकपदी कायम होता. वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल, वनमजूर यांच्यावर सतत अन्याय करीत होता, अशी माहिती आता पुढे आली आहे. रेड्डी आणि शिवकुमार हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे दीपाली आत्महत्याप्रकरणाने स्पष्ट होते.

---------------

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत बजावली नोटीस

राज्य महिला आयोगाने ‘लोकमत’मध्ये २६ मार्च रोजी ‘महिला आरएफओंची गोळी झाडून आत्महत्या, हरिसाल येथील घटना, मानसिक व वैयक्तिक आरोप, सुसाईड नोटमध्ये उपवनसंरक्षकांचे नाव’ या आशयाचे वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत २९ मार्च रोजी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील यांनी एम.एस. रेड्डी यांना राज्य महिला आयोग अधिनियम १९९३, कलम १० (२) नुसार तक्रार निवारनार्थ नोटीस बजावली होती, हे विशेष.

Web Title: Srinivas Reddy has been given a deadline of April 30 by the Women's Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.