प्रगत क्रीडा अभ्यासासाठी श्रीलंकेची चमू अमरावतीत
By Admin | Updated: August 11, 2014 23:38 IST2014-08-11T23:38:50+5:302014-08-11T23:38:50+5:30
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील प्रगत क्रीडा अभ्यासासाठी श्रीलंकेतील १९ अधिकारी-विद्यार्थ्यांची चमू येथे दाखल झाली आहे. ही चमू सहा दिवस येथील क्रीडा प्रकाराचा अभ्यास करणार आहे.

प्रगत क्रीडा अभ्यासासाठी श्रीलंकेची चमू अमरावतीत
अमरावती : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील प्रगत क्रीडा अभ्यासासाठी श्रीलंकेतील १९ अधिकारी-विद्यार्थ्यांची चमू येथे दाखल झाली आहे. ही चमू सहा दिवस येथील क्रीडा प्रकाराचा अभ्यास करणार आहे.
येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील क्रीडा प्रकाराचा अभ्यास करण्यासाठी श्रीलंका शासनाची ही चमू रविवार १० आॅगस्ट रोजी अमरावतीत दाखल झाली. १६ आॅगस्टपर्यंत ही चमू येथे राहणार आहे. या चमूमध्ये श्रीलंकेतील राष्ट्रीय क्रीडा विज्ञान संस्थेचे संचालक शांता विरासिंगे, अभ्यास दौऱ्याचे समन्वयक रत्ने पथीराणे, कार्यक्रम अधिकारी रमायानाथ, शारीरिक शिक्षक कुमारा, थिसारा यांच्यासह १४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे. श्रीलंकेहून मुंबई तेथून नागपूर व नंतर अमरावती असा या चमूचा प्रवास राहिला. ही चमू एमपीएड व योगाच्या अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. आज सोमवारी पहाटे या चमूने योगाचे धडे घेतले. त्यानंतर फुटबॉल खेळात ते रमले व दुपारच्या सत्रात त्यांनी श्रीहव्याप्र मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
श्रीहव्याप्र मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा महाराष्ट्र योग संघटनेचे सह कार्यवाहक अरुण खोडस्कर हे १२ मार्च रोजी श्रीलंकेत गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील क्रीडा मंत्र्यांची भेट घेऊन श्रीहव्याप्र मंडळात सुरु असलेल्या क्रीडा उपक्रमाची माहिती त्यांना दिली होती. ही चमू जून महिन्यात येथे दाखल होणार होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना सुटी असल्याचे कळविल्याने त्यांनी १० ते १६ आॅगस्ट ही दौऱ्याची तारीख निश्चित केली. या अभ्यास दौऱ्यानंतर लवकरच श्रीहव्याप्र मंडळ व श्रीलंका शासनासोबत क्रीडा संदर्भात सामज्यस करार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी जर्मन व डेनमार्कशी श्रीहव्याप्र मंडळाचा सामज्यस करार झालेला आहे, अशी माहिती अरुण खोडस्कर यांनी दिली.