‘दोन चंद्रां’बाबतचा प्रसार तथ्यहीन!

By Admin | Updated: July 5, 2015 00:28 IST2015-07-05T00:28:22+5:302015-07-05T00:28:22+5:30

अवकाशात ४ जुुलै रोजी व त्यानंतर दोन चंद्र दिसणार, असा संदेश ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून वेगाने प्रसारित झाला.

The spread of 'two moons' is unfathomable! | ‘दोन चंद्रां’बाबतचा प्रसार तथ्यहीन!

‘दोन चंद्रां’बाबतचा प्रसार तथ्यहीन!

आधार नाही : अभ्यासकांची दिशाभूल
अमरावती : अवकाशात ४ जुुलै रोजी व त्यानंतर दोन चंद्र दिसणार, असा संदेश ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून वेगाने प्रसारित झाला. या संदेशानुसार मंगळ हा पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने आकाशात दोन चंद्रांचे दर्शन घेता येईल, असे सांगण्यात आले. मात्र, या संदेशाला खगोलशास्त्रानुसार कोणताही आधार नाही. परिणामी जिज्ञासू विद्यार्थी व अभ्यासकांनी स्वत:ची दिशाभूल होऊ देऊ नये, असे आवाहन हौशी खगोलशास्त्रज्ञ विजय गिरूळकर यांनी केले आहे.
गेल्या पंधरवड्यापासून ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून ४ जुलै रोजी व त्यानंतर आकाशात दोन चंद्र दिसणार असल्याचे संदेश वेगाने प्रसारित झाले. त्यामुळे सामान्यांची उत्सुकता बळावली. एकाच आकाशात दोन चंद्र कसे दिसणार? हा प्रश्न अनेकांना पडला. खगोलशास्त्रानुसार दर २६ महिन्यांनी मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या जवळ येतो. तो लाल असल्याने अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येतो. परंतु तो कितीही जवळ आला तरी चंद्राप्रमाणे दिसू शकत नाही. दुर्बिणीतून मंगळ पाहिला असता तो क्रिकेटच्या चेंडूपेक्षाही लहान दिसतोे. त्यामुळे एकाच दिवशी आकाशात दोन चंद्र दिसणार, ही केवळ अफवा असल्याचे गिरूळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सोशय मीडियातील संदेशामुळे गैरसमज निर्माण होऊन खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची व जिज्ञासूंची दिशाभूल होऊ शकते. तसेच हा संदेश खगोलशास्त्राच्या विरोधात असल्याने अशा संदेशांना जिज्ञासुंनी अजिबात महत्त्व देऊ नये, असे आवाहनही विजय गिरूळकर यांनी केले आहे.

३० मे २०१६ ला मंगळ येणार पृथ्वीच्या जवळ
खगोलशास्त्रानुसार ३० मे २०१६ रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ राहिल. या दिवशी पृथ्वी-मंगळ हे अंतर ७ कोटी ५२ लक्ष किलोमिटर असेल. यापूर्वी १४ एप्रिल २०१४ रोजी मंगळ-पृथ्वीच्या जवळ आला होता. यादिवशी पृथ्वी-मंगळातील अंतर ९ कोटी २३ लक्ष किलोमीटर इतके होते.

Web Title: The spread of 'two moons' is unfathomable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.