अमरावती तहसीलच्या विभाजनाचा मार्ग प्रशस्त
By Admin | Updated: February 2, 2016 00:16 IST2016-02-02T00:16:18+5:302016-02-02T00:16:18+5:30
मुंबई, पुणे, नागपूरसह अमरावती तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याचे सुतोवाच दस्तुरखुद्द महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे.

अमरावती तहसीलच्या विभाजनाचा मार्ग प्रशस्त
२०१३ चा प्रस्ताव : तहसीलदारांवर १४२ गावांचा भार
अमरावती : मुंबई, पुणे, नागपूरसह अमरावती तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याचे सुतोवाच दस्तुरखुद्द महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावती तहसीलच्या विभाजनाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
शहरासह अमरावती तालुक्यातील तब्बल १४२ गावे अमरावती तहसीलशी संलग्न आहेत. विभाजन झाल्यास लोकसंख्यावाढीमुळे अमरावती तहसील कार्यालयावर वाढलेला ताण कमी होणार आहे. प्रशासकीय कामाच्या सुश्रुती करण्यासाठी १५ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसह महानगरासाठी तहसील कार्यालयाची रचना करण्याचे संकेत महसूलमंत्र्यांनी दिले. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, नागपुर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि अमरावती शहराचा यात समावेश राहण्याचे सुतोवाच त्यांनी केले. त्या अनुषंगाने महानगरपालिका तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याचा अनेक वर्षापासून धूळखात पडलेला प्रस्ताव आता मार्गी लागणार आहे. अमरावतीसह ८ महानगरांतील स्वतंत्र तहसील कार्यालयामुळे तहसीलदारांसह नायब तहसीलदारांची पदे वाढतील. महसूलमंत्र्यांच्या घोषणेमुळे या तहसीलच्या विभाजनाचा मुद्दा पुन्हा प्रकाशझोतात झाला आहे.