वरिष्ठ लिपिकासह क्रीडाधिकारी निलंबित
By Admin | Updated: March 30, 2017 00:06 IST2017-03-30T00:06:16+5:302017-03-30T00:06:16+5:30
प्रशासकीय आदेशाला न जुमानणाऱ्या वरिष्ठ लिपिकासह प्रभारी क्रीडाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

वरिष्ठ लिपिकासह क्रीडाधिकारी निलंबित
महापालिकेत खळबळ : आयुक्तांची कारवाई
अमरावती : प्रशासकीय आदेशाला न जुमानणाऱ्या वरिष्ठ लिपिकासह प्रभारी क्रीडाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त हेमंत पवार यांनी बुधवारी सकाळी निलंबनाचे आदेश काढलेत. यानिलंबनामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रभारी क्रीडाधिकारी चंद्रकांत देशमुख आणि वरिष्ठ लिपिक प्रवीण ठाकरे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ‘लिपिकाला सोडवेना क्रीडाधिकाऱ्यांची खुर्ची’ व ‘खुर्ची एक कर्मचारी दोन’, या वृत्तातून लोकमतने क्रीडाधिकाऱ्यांच्या ‘संगीत खुर्ची’चा प्रकार उघड केला होता. त्याअनुषंगाने आयुक्तांनी हे कारवाईस्त्र उगारले आहे.
प्रभारी क्रीडाधिकारी प्रवीण ठाकरे यांची ९ फेब्रुवारीच्या आदेशाने झोन क्रमांक ५ येथे वरिष्ठ लिपिक म्हणून बदली झाली. त्याचवेळी झोन क्रमांक १ चे कनिष्ठ लिपिक चंद्रकांत देशमुख यांच्याकडे क्रीडाधिकारीपदाचा तात्पुरता प्रभार देण्यात आला. तथापि देशमुख यांना चार्ज न देता ठाकरे वैद्यकीय रजेवर निघून गेले.
आयुक्तांनी दबाव झुगारला
अमरावती : वैद्यकीय रजेवरून परतल्यानंतर बदलीस्थळी रुजू न होता ते क्रीडाधिकारी पदावर अनधिकृतपणे रूजू झाले. दरम्यान, देशमुख यांनीही क्रीडाधिकाऱ्यांचा चार्ज घेतला. ठाकरे यांनी याबाबत कुणालाही पूर्वकल्पना दिली नाही आणि दोघेही क्रीडाधिकारी म्हणून हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करू लागले. दोघांच्याही स्वाक्षरीचे हे मस्टर ‘लोकमत’च्या दृष्टीस पडले व अनधिकृत ‘संगीत खुर्चीचा’ पर्दाफाश झाला. देशमुख आणि ठाकरे या उभय कर्मचाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नाही, ही बाब कार्यालयीन शिस्तीच्याविरूद्ध व गंभीर स्वरूपाची असल्याने दोघांना तत्काळ निलंबित केल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. ठाकरे या कर्मचाऱ्याविरुद्ध कुठलीही कारवाई करू नये, यासाठी आयुक्तांवर राजकीय दबाव आणला गेला. एका राजकीय नेत्याने त्यासाठी आयुक्तांना दूरध्वनी केला. मात्र, हा दबाव झुगारत आयुक्तांनी ठाकरेंसह देशमुख यांनाही निलंबित केले.
ठाकरेंवरील आरोप
प्रभारी क्रीडाधिकारी प्रवीण ठाकरे यांची ९ फेब्रुवारीच्या आदेशाने भाजीबाजार झोनमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून बदली करण्यात आली. मात्र, ते बदलीच्या ठिकाणी रूजू न झाल्याने झोन क्र. ५ च्या करवसुलीत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. कार्यालयीन कामाची निकड लक्षात घेऊन ठाकरे यांना रूजू होण्याबाबत कळविण्यात आले. मात्र, बदलीच्या ठिकाणी रुजू न होता ते वैद्यकीय रजेवर निघून गेले व २३ मार्च रोजी क्रीडाविभागात अनधिकृतपणे रूजू झाले.
म्हणून देशमुख निलंबित
९ फेब्रुवारीला चंद्रकांत देशमुख यांच्याकडे क्रीडाधिकारीपदाचा तात्पुरता पदभार सोपविण्यात आला. परंतु, झोन १ चे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत झोन क्र. १ मध्येच उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्यात. मात्र, ते झोन कार्यालयात उपस्थित झाले नाहीत. सहायक आयुक्त आणि उपायुक्त प्रशासन यांनी त्याबाबत देशमुख यांना वारंवार सूचना दिल्या; तथापि ते उपस्थित न झाल्याने करवसुलीच्या कामात अडथळा निर्माण झाला. वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना केल्याचा ठपका ठेवत देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबनकाळात चंद्रकांत देशमुख यांचे मुख्यालय झोन क्रमांक २ राजापेठ तर प्रवीण ठाकरे यांचे मुख्यालय झोन क्रमांक ४ बडनेरा राहणार आहे. दोघांच्या निलंबन आदेशात हे नमूद करण्यात आले आहे. त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.