क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:13 IST2021-07-31T04:13:29+5:302021-07-31T04:13:29+5:30
फोटो पी ३० ठाकूर अमरावती : विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम ...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार
फोटो पी ३० ठाकूर
अमरावती : विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.
विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संकुल आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार
सुविधा निर्माण करतानाच उत्पन्नवाढीच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक, अंतर्गत रस्ते, आवश्यक साहित्य व क्रीडा सुविधांचे बळकटीकरण आदी कामे करावयाची आहेत. अशा आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सादरीकरण करावे. याबाबत विभागीय क्रीडा संकुलात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीनुसार गाळे भाडे सुधारणा व निश्चितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अभिप्राय घ्यावा. जिल्हा क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. अद्याप काही प्राथमिक बाबी व सुविधांवर १ कोटी रुपये खर्च झाला. तथापि, इतरही कामे लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. ही कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
०००