पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:14+5:302021-02-05T05:28:14+5:30
अमरावती : आरोग्य विभागाच्यावतीने रविवारी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना डोज ...

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती : आरोग्य विभागाच्यावतीने रविवारी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना डोज देण्यात आले. या मोहिमेेला शहरी आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य यंत्रणांच्या चमूने या पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी जागोजागी बूथ उभारले होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते रायन फर्नांडिस, सौरवी शिरीष किंडे, अभिषेक सोनू उईके, सागर पंकज राजनकर या बालकांना लस पाजून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यावेळी उपस्थित होते. मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ४३० बालकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरणापासून एकही बालक वंचित राहता कामा नये, यासाठी गृहभेटीही देण्यात येत आहेत. महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, ढाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या सर्वांचे लसीकरण व्हावे, असे निर्देश पालकमंत्री यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
-------------------------
शहरी भागातील पोलिओ लसीकरण
अमरावती : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत महापालिकेच्या राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ गाडगे नगर येथे आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका सुरेखा लुंगारे, मनपा वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता सीमा नेताम, जयश्री नांदुरकर आदी उपस्थित होते. दरम्यान, साईनगर येथे महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, आयुक्त प्रशांत रोडे, नगरसेविका मंजूषा जाधव यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाला प्रारंभ झाला. महापालिका क्षेत्रात ६६ हजार ८९० बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती आहे.