कंत्राटी नियुक्ती प्रकरणाच्या चौकशीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST2021-03-13T04:23:41+5:302021-03-13T04:23:41+5:30
धारणी : शहरातील कोविड केअर सेंटरवर कंत्राटी नियुक्तीकरिता तेथीलच कर्मचारी गायगोले यांनी प्रत्येकी १२ हजार रुपये घेतले. तालुका आरोग्य ...

कंत्राटी नियुक्ती प्रकरणाच्या चौकशीला वेग
धारणी : शहरातील कोविड केअर सेंटरवर कंत्राटी नियुक्तीकरिता तेथीलच कर्मचारी गायगोले यांनी प्रत्येकी १२ हजार रुपये घेतले. तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत पवार यांनी राबविलेली प्रक्रियासुद्धा संशयास्पद आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाची चौकशी डीएचओ दिलीप पांडे यांच्याकडून सुरू झाली असून, लवकरच सत्य बाहेर येणार आहे.
याबाबत ‘लोकमत’ने वृत्तमालिका चालवून आदिवासी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी त्याची दखल घेतली. चौकशीचे आदेश दिलेत. त्यानुसार एडीएचओ दिलीप पांडे यांनी सोमवारी धारणी तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार, कर्मचारी गायगोले, तालुका विस्तार अधिकारी सपकाळ यांचे लेखी बयाण नोंदविले आहे. त्यासह अन्यायग्रस्त आदिवासी कंत्राटी कर्मचाऱ्यांचेदेखील बयाण नोंदविले. या सर्व बाबीचा चौकशी अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्याकडे सोपविला जाणार आहे.
बॉक्स
रक्कम कुणाच्या खिशात?
आदिवासी कंत्राटी कर्मचारी अजय डहाके, सुधीर सेलेकर, संजू यांच्याकडून कंत्राटी नियुक्तीकरिता प्रत्येकी १२ हजार रुपये कर्मचारी गायगोले यांनी उकळले. ते घेताना गायगोले यांनी ते पैसे वरिष्ठांना द्यावे लागतात, असे सांगितले. मग आता नेमकी ती रक्कम कुणाच्या खिशात गेली, हे शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पैसे लवकर परत द्या हो
मेळघाटातील आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा होळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आम्ही सोने चांदी गहाण ठेवून, व्याजाने पैसे काढून गायगोले यांना दिले. मात्र, अवघे काही दिवस काम केल्यानंतर १२ हजार रुपयेही गेले अन् नौकरीही गेली. हाती काहीच उरले नसल्याने पुन्हा हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ आली. संपूर्ण कुटुंबाचा भार आमच्यावर आहे. त्यामुळे होळीपूर्वी ती १२ हजारांची रक्कम आम्हाला परत द्या, अशी मागणी त्या आदिवासी युवकांनी चौकशी अधिकारी पांडे यांच्याकडे केली.