ग्रामीण भागात सट्टा बाजार तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST2021-01-13T04:32:14+5:302021-01-13T04:32:14+5:30
पान ३ चे लिड धामणगाव रेल्वे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला केवळ दोन दिवस शिल्लक राहिले असताना, ग्रामीण ...

ग्रामीण भागात सट्टा बाजार तेजीत
पान ३ चे लिड
धामणगाव रेल्वे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला केवळ दोन दिवस शिल्लक राहिले असताना, ग्रामीण भागात उमेदवारांच्या मतांवर व गटागटांवर सट्टा लावला जात आहे. चलनात दिसत नसलेल्या २५, ५० पैशांना ही बोली लावण्यात आली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात राजकीय रंग चढला आहे. अनेक नातेवाईक एकमेकांसमोर मतांसाठी उभे ठाकले आहेत. सोबत सट्टा बाजार तेजीत आला आहे. एका प्रभागातील कोणत्या गटाचा उमेदवार विजयी होईल, एखाद्या प्रभागातील तीन उमेदवारांपैकी किती उमेदवार विजयी होतील, त्यातील कुणाला किती मते मिळतील, इतर विजयी उमेदवारांच्या तुलनेत गावात सर्वाधिक मते कुणाला मिळेल, कोणता उमेदवार किती मतांनी पराभूत होईल, याची बेरीज-वजाबाकी निवडणूक असलेल्या गावोगावच्या सट्टा बाजारात लावली जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात सरपंचपदाचे आरक्षण कोणते निघेल, यासाठीही सट्टा खेळला जात आहे. चलनात दिसत नसलेल्या रकमेवर उमेदवारांच्या मतांची टक्केवारी लावली जात आहे. तालुक्यात सर्वाधिक उमेदवार कोणत्या गटाचे निवडून येतील, याचीही चर्चा सट्टे बाजारात अधिक आहे.
वर्चस्वाची लढाई जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी या ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले असल्याने, शहरातील अनेक सट्टेबाज आता ग्रामीण भागात या निवडणुकीच्या माध्यमातून पोहोचले असल्याचे पाहायला मिळत आहे.
इतर राज्यांत गेलेले मतदारही पोहोचले गावात
पोटाची खळगी भरण्यासाठी काही कुटुंबे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमधील काही भागात मोलमजुरीसाठी गेले आहेत. गावातील आपला नातलग निवडणुकीच्या रिंगणात उभा असल्याने असे मतदार गावाकडे परतले आहेत. उमेदवारांनीच अशा मतदार कुटुंबाचे रेल्वे, एसटीचे आरक्षण पूर्वीच केले. दिवाळी, दसऱ्याला गावाला नाही गेले तर चालेल, मात्र आज आपल्या उमेदवाराला मताची गरज अधिक असल्याने इतर राज्यांसह मुबंई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद येथील कंपनीत असलेले मतदार आपल्या गावात मतदानासाठी आले आहेत.