विशिष्ट कंत्राटदाराचे चांगभले
By Admin | Updated: June 26, 2016 00:06 IST2016-06-26T00:06:09+5:302016-06-26T00:06:09+5:30
महापालिकेच्या आमसभेने मंजुरी दिलेल्या पे अॅँण्ड पार्किंगमध्ये कंत्राटदाराचेच चांगभलं होणार

विशिष्ट कंत्राटदाराचे चांगभले
४ जून रोजी 'रास्ता रोको' : ‘पे अॅण्ड पार्किंग’ला विरोध
अमरावती : महापालिकेच्या आमसभेने मंजुरी दिलेल्या पे अॅँण्ड पार्किंगमध्ये कंत्राटदाराचेच चांगभलं होणार असल्याचा आरोप राजापेठ रेल्वे क्रॉसिंग गेट कृती समितीचे मुन्ना राठोड यांनी शनिवारी केला. या प्रस्तावाविरोधात ४ जुलै रोजी आपण 'रास्ता रोको' करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रपरिषदेत दिली.
दोन दोन रुपये जमा करण्यासाठी महापालिका इतकी कफल्लक झाली का, असा सवाल मुन्ना राठोड यांनी उपस्थित केला. विशिष्ट कंत्राटदारांच्या घशात घालण्यासाठीचा हा नियोजित कार्यक्रम असल्याचे सांगत या प्रकाराने शहरातील शांतता भंग होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी नागरिकांनी समोर यावे, असे आवाहन त्यांनी केले.
पे अॅण्ड पार्किंगचा मुद्दा जोरकसपणे मांडणाऱ्या वसंतराव साऊरकरांवर त्यांनी आक्षेप घेतला. साऊरकरांनी साडेचार वर्षांत केवळ आपल्याच भूखंडासाठी निधी वापरल्याचा आरोप राठोड यांनी केला.
पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आ. सुनील देशमुख यांनी या प्रकारातून अमरावतीकरांची सुटका करावी, असे आवाहनसुध्दा राठोड यांनी केले आहे. विशिष्ट नगरसेवकांची मर्जी राखण्यासाठी आणि त्यांच्या जवळच्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी हा आटापीटा सुरु असल्याचा आरोपही राठोड यांनी केला. (प्रतिनिधी)
राजापेठ उड्डाण पूल 'मौत का कुआ'
गद्रे चौकातील निर्माणाधीन उड्डाण पुलामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या अनियंत्रित वाहतुकीचा अतिरिक्त भार बुटी प्लॉटमधील रहिवाशांना सहन करावा लागत असल्याचे राठोड म्हणाले. महापालिकेतील देशमुख नामक अभियंता कंत्राटदार चाफेकरची दलाली करतो, असा आरोप करीत उड्डाण पुलासाठी पुरेसा निधी नसल्याचे ते म्हणाले. सोमवारपासून शाळांना सुरुवात होत असल्याने येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अन्यथा ४ जुलै रोजी गद्रे चौकातच रास्ता रोको करण्याचा इशारा पत्रपरिषदेदरम्यान देण्यात आला.