-आता घातक अन्नपदार्थ शोधण्यासाठी खास पथक
By Admin | Updated: December 5, 2015 00:13 IST2015-12-05T00:13:41+5:302015-12-05T00:13:41+5:30
अन्न पदार्थांमध्ये होणारी भेसळ, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे भेसळीचे दुष्परिणाम पाहता यापुढील काळात अन्न व औषधी प्रशासन विभाग ‘एफडीए’ असुरक्षित अन्नपदार्थांचा शोध ...

-आता घातक अन्नपदार्थ शोधण्यासाठी खास पथक
आयुक्तांचे नियंत्रण : कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
अमरावती : अन्न पदार्थांमध्ये होणारी भेसळ, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे भेसळीचे दुष्परिणाम पाहता यापुढील काळात अन्न व औषधी प्रशासन विभाग ‘एफडीए’ असुरक्षित अन्नपदार्थांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. अन्नसुरक्षा व मानदे अधिनयम २००६ व नियम २०११ ची राज्यात प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने विशेष पथक निर्माण करण्यात आले आहे. हे पथक वेगवेगळ्या सहा स्तरांवर काम करणार आहे.
ग्राहकांच्या रोजच्या जीवनाशी निगडित दूध, खाद्यतेल, मसाले, हॉटेल आयातीत अन्नपदार्थ आदी सुरक्षित उपलब्ध होण्यासाठी कारवाईची रुपरेषा आखून ती सादर करण्यासोबतच अन्नपदार्थात शरीरास अपायकारक घटक पदार्थांचावापर करणाऱ्या उत्पादकांचा शोध घेऊन अशा कंपन्यांची यादी पुढील कारवाईकरिता पुढे पाठविण्याची जबाबदारी या विशेष पथकावर आहे. विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात असुरक्षित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठा, वितरण याचा वेळोवेळी शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दिले आहेत. विशेष पथकाच्या मुख्य नियंत्रकाची जबाबदारी अन्नसुरक्षा आयुक्त, अन्न व औषधी प्रशासनाकडे देण्यात आली असून मुख्य समन्वयक म्हणून कोकण विभागाचे अन्न सहआयुक्त सु.स. देशमुख हे काम पाहतील. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकाला कारवाईचा संपूर्ण अहवाल आयुक्तांकडे पाठवायचा आहे. (प्रतिनिधी)